कोनशिला (कविता)


 कोनशिला 


​"बुद्धिस्ट हायस व्हय...?"

तिच्या या साध्या, रांगड्या प्रश्नाने

मी मात्र पुरती बुचकळ्यात पडले.


माझ्या वैचारिक श्रीमंतीचे इमले

एका क्षणात कोसळून पडले.


​"न्हाई, ते स्टेटस ठिवलंय ना तुम्ही आज...

म्हणून ईचारलं, तुम्ही आमच्यातलेच ना?"


​तिचा तो प्रश्न, तो 'आमच्यातले'पणाचा शोध,

माझ्या पदव्यांना, माझ्या वाचनाला टोचणी लावून गेला.


मी बुद्ध वाचला, बुद्ध ऐकला, बुद्ध मांडलाही...

पण तो रक्तात भिनायचा मात्र राहूनच गेला.


तत्त्वज्ञानाच्या जगात मी विहारासारखी सजले,

पण प्रत्यक्ष जगताना जुन्याच कोशात रूतून बसले.


​छे! बुद्धिहीन गलबतात अडकलेले माझे विचार,

आणि त्यावर साचलेले पूर्वग्रहांचे मळभ...

तिच्या त्या एका प्रश्नाने,

माझ्या तथाकथित प्रगल्भतेचे मुखवटे गळून पडले.


​वाचन केवळ अनुभूती देते,

पण विचारांचा विकास तर संघर्षातून होतो.


संस्कृती, इतिहास आणि भोवतालच्या घटनांचे पाश,

पायांत बेड्या बनून जखडलेले असतात.

जाणीवपूर्वक हे पाश तोडण्याचा सराव करावा लागतो,

स्वतःला स्वतःविरुद्धच सिद्ध करावं लागतं.


​कदाचित तेव्हाच...

सहजतेने सामोरे जाता येईल तिच्या प्रश्नाला.

आणि नव्याने पाहता येईल 'जातीची' ती कोनशिला,

जी हजारो वर्षांपासून आजही उभी आहे—

तिच्या आणि माझ्या विचारांच्या सीमेवर!

       

                                                       ​—  तेजश्री शिंदे✍️

Comments

  1. पिढ्यानपिढ्या धगधगत असलेल्या ज्वलंत विषयावर अगदी मार्मिक शब्दानी बोट ठेवले आहेस आज तेजू.
    या कोनशिलेचा मी असा कोपरा आहे की, मला तुझ्या लेखणी ची नेहमी जशी समीक्षा करतो तितकी स्पष्ट आणि संपूर्ण समीक्षा इथे मांडू शकत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. सातत्याने वेळोवेळी आपल्याला आपले आत्मपरीक्षण करत राहिले पाहिजे. अनेकवेळा आपला समज होतो की आपण एखादी विचारसरणी अंगीकारली आहे.. पण काही घटना अशा घडतात त्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण जीवन मूल्य म्हणून स्वीकारतो तेव्हा कालांतराने त्याचे परीक्षण करत राहिले पाहिजे... नाहीतर "कथनी और करनी मैं फर्क़ आ जाता है। " धन्यवाद अझहर.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

गझल: रक्तबंबाळ चांदणे

कळून आले (कविता)