अमरचे पत्र (5)
अमरचे पत्र (5) 'ट्युलिप्स: दुःखाची रंगीत भाषा' प्रिय सखी, आज तुला हे पत्र लिहायला बसलो आहे तेव्हा खिडकीबाहेर संध्याकाळ अगदी अलगद, एखाद्या हळुवार श्वासासारखी उतरते आहे. कॅनडातला हा ऋतू मला अजूनही पूर्णपणे आकळलेला नाही. इथली थंडी माणसाला फक्त वरून गोठवत नाही सखी, ती आतल्या एकांतालाही एक विशिष्ट आकार देते. अनेक महिने बर्फाच्या पांढऱ्या कफनखाली निजलेली जमीन अचानक एक दिवस रंगांचा उत्सव साजरा करू लागते; तेव्हा जाणवतं—निसर्ग कधीच मृत नसतो, तो फक्त एका योग्य ऋतूची, एका योग्य क्षणाची वाट पाहत असतो. इथे सध्या ट्युलिप्सचा मोसम सुरू झाला आहे. पहिल्यांदा जेव्हा मी फुलांच्या त्या लांबच लांब रांगा पाहिल्या, तेव्हा मला तुझी तीव्रतेने आठवण आली. कारण त्या ट्युलिप्समध्ये एक अजब, सुसंस्कृत संयम आहे. त्यांच्याकडे पाहून असं वाटतच नाही की त्यांनी इतका प्रदीर्घ, क्रूर हिवाळा आणि बर्फाचे अत्याचार सहन केले असतील. ती इतक्या शांतपणे, न ओरडता उमलतात की जणू त्यांनी स्वतःच्या दुःखालाही सौंदर्...