कोनशिला (कविता)
कोनशिला
बुद्धिस्ट हायस व्हय..
अचानक आलेल्या या प्रश्नाने
मी बुचकळ्यात पडले.
न्हाई ते स्टेटस ठिवलया ना तुम्ही आज
म्हणुन ईचारल, तुम्ही आमच्यातलेच ना?
मी वाचलाय बुद्ध आणि विचारातही उतरवला,
पण अंगवळणी पडायचा राहूनच गेला.
किंबहुना नाहीच समजून घेतला,
कि जमलाच नाही आत्म्यावर कोरून ठेवायला.
छे! बुद्धिहीन गलबतात फसून राहिलेला
माझ्या विचारांचा आसमंत मळभ चढलेला
तिच्या एका प्रश्नाने प्रभावहीन भासला.
वाचन देत जाते अनुभूती अनेक अंगांची
पण विचार, विकास यावर परिणाम होतोच
संस्कृती, इतिहास आणि तत्कालीन घटनांचा
काही गोष्टी या जाणीवपूर्वक झुगारून देण्याचा
प्रयत्न करत रहावा लागतो सातत्याने...
तेव्हाच सहजतेने सामोरे जाता येईल तिच्या प्रश्नाला
आणि नव्याने पाहता येईल जातीची कोनशिला
जी हजारो वर्षांपासून उभी आहे...
तिच्या-माझ्या विचारांच्या प्रवासात..!

Nice 👍
ReplyDeleteपिढ्यानपिढ्या धगधगत असलेल्या ज्वलंत विषयावर अगदी मार्मिक शब्दानी बोट ठेवले आहेस आज तेजू.
ReplyDeleteया कोनशिलेचा मी असा कोपरा आहे की, मला तुझ्या लेखणी ची नेहमी जशी समीक्षा करतो तितकी स्पष्ट आणि संपूर्ण समीक्षा इथे मांडू शकत नाही.
सातत्याने वेळोवेळी आपल्याला आपले आत्मपरीक्षण करत राहिले पाहिजे. अनेकवेळा आपला समज होतो की आपण एखादी विचारसरणी अंगीकारली आहे.. पण काही घटना अशा घडतात त्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण जीवन मूल्य म्हणून स्वीकारतो तेव्हा कालांतराने त्याचे परीक्षण करत राहिले पाहिजे... नाहीतर "कथनी और करनी मैं फर्क़ आ जाता है। " धन्यवाद अझहर.
Delete