पानगळीत हरवलेला पाऊस....सखी'चे पत्र (9)


वाचकांसाठी…

​“काही नाती आपल्यासोबत राहण्यासाठी नसतातच...
ती आपल्यातून जाण्यासाठी येतात.
जसा एखादा ऋतू.
जसं एखादं पुस्तक, जे वाचून झाल्यावर कपाटात ठेवून देतो, पण त्यातलं एखादं वाक्य मात्र अनेक वर्षं आपल्यासोबत चालत राहतं...”
​
            सखीच्या पत्रातील ही ओळ काळजाला अशी काही भिडते, की आपण नकळत जुन्या दिवसांच्या आठवणीत हरवून जातो.
​आजच्या "विशेष" भागात सखीने अमरला लिहिलेलं हे पत्र केवळ शब्दांचं नाही,
तर ते एका ओल्या, मातीच्या सुगंधाने भारलेल्या शांत संध्याकाळचं प्रतीक आहे.
​            एकाच वेळी बुद्धीला विचार करायला लावणारी आणि मनाला हळूवार स्पर्श करणारी ही पत्रमालिका...खास तुमच्यासाठी!

​वाचा आणि तुम्हाला यातली कोणती ओळ सर्वात जास्त आपली वाटली, ते नक्की सांगा.

​अमर आणि सखी — यांची मागील सर्व पत्रे वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर नक्की क्लिक करा. 👇

https://tejashrishinde.blogspot.com/2026/05/5.html

*********


“पानगळीत हरवलेला पाऊस”

 सखी'चे पत्र (९)


​प्रिय अमर,

​           तुझ्या उत्तराची वाट पाहणे म्हणजे समुद्राच्या लाटा मोजण्यासारखे झाले आहे. लाटा येतात, किनाऱ्याला स्पर्शून पुन्हा अथांगतेत विलीन होतात; पण त्या वाळूवर उमटवून जातात केवळ एक गूढ, भिजलेली खूण. 

          तुझ्या शांततेची सवय मला नाही असे नाही, पण कधी कधी हीच शांतता घराच्या शांत कोपऱ्यातल्या जुन्या घड्याळाच्या लंबकासारखी एकसुरी आणि जड वाटू लागते. लंबकाची टिकटिक चालत राहते, 

काळ पुढे सरकत राहतो, पण खोलीतल्या निर्वात पोकळीत काहीच बदलत नाही.

​ काल रात्री इथे अचानक पाऊस सुरू झाला...उकाड्याने तप्त झालेली जमीन पहिल्याच सरीने शहारून उठली. खिडकीच्या तावदानांवर पाण्याचे थेंब एका लयीत ओघळत होते. मातीचा तो तीव्र, आदिम गंध थेट मनाच्या गाभाऱ्यात शिरला आणि क्षणात मला कित्येक मैल दूर उभ्या असलेल्या तुझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. 

             खिडकीबाहेर अंधारात भिजणारे गुलमोहराचे झाड आणि त्याच्या लाल रंगाच्या पाकळ्यांचा चिखलात झालेला सडा पाहून मनात आले—

निसर्ग किती सहजपणे स्वतःला उधळून देतो नाही? 
त्याला कुठल्याही बंधनाची, 
परिणामांची किंवा 
साचलेपणाची भीती नसते. 

             पण आपण माणसे मात्र भावनांचे हिशोब मांडण्यात, सामाजिक मर्यादांच्या तटबंदी उभारण्यात आणि स्वतःला सुरक्षित कुंपणात कोंडून घेण्यातच आयुष्य खर्ची घालतो.

​             अमर, तू कॅनडाच्या त्या बर्फाळ, शिस्तबद्ध जगात स्थिरावताना इथल्या या मातीच्या ओलसर गंधाला विसरलास का? की बर्फाच्या थंड हवेने तुझ्या आतल्या भावनांचे पाणीही गोठवून टाकले आहे?

​             गेल्या काही दिवसांत कामाच्या व्यापात आणि शहराच्या धावपळीत अनेक गोष्टी घडल्या. बॅक ऑफिसमधून बाहेर पडून क्लायंट्सच्या विश्वात फिरताना मला रोज माणसांच्या नव्या मुखवट्यांची आणि त्यांच्या आतल्या विषण्णतेची ओळख होत आहे. 

              परवा एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या गगनचुंबी कॉर्पोरेट टॉवरमध्ये गेले होते. काचेच्या पारदर्शक भिंती, सेंट्रलाईज्ड एसीची बोचरी थंडी, बूट आणि हिल्सचा टाईल्सवर होणारा एकटक आवाज, आणि चेहऱ्यावर एक कृत्रिम व्यावसायिक हास्य चिकटवून वावरणारी माणसे. तिथे एका कॉन्फरन्स रूमबाहेर मी जवळपास दोन तास थांबले होते.

​ माझ्या समोरच्या एका छोट्या केबिनमध्ये एक मध्यमवयीन गृहस्थ बसले होते. 

त्यांच्या टेबलावर लॅपटॉप, फाईल्सचा ढीग 

आणि बाजूला त्यांच्या कुटुंबाचा—पत्नी आणि दोन गोंडस मुलांचा—एक हसरा फोटो ठेवलेला होता. 

तो माणूस फोनवर कुणाशी तरी अगदी करड्या, व्यावसायिक भाषेत बोलत होता. 

बोलता बोलता त्यांनी समोरच्या काचेतून बाहेर पाहिले, फोन कट केला आणि क्षणार्धात त्यांचा चेहरा असा पडला जणू त्यांनी कित्येक शतकांचा थकवा एकाच क्षणात स्वतःवर ओढवून घेतला असावा. 

             त्यांनी टेबलावरील तो कौटुंबिक फोटो उलटून ठेवला, डोके दोन्ही हातांत धरून काही सेकंद मिटलेल्या डोळ्यांनी श्वास घेतला, आणि पुढच्याच क्षणी डोळ्यांवरचा चष्मा नीट करत पुन्हा फाईल्स चाळायला सुरुवात केली.

​ तो क्षण माझ्या मनाला असा काही टोचून गेला म्हणून सांगू!   

             आपण ज्याला ‘यशस्वी आयुष्य’ म्हणतो, ते खरंच आपल्याला शांतता देते का? की ती केवळ एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत उडी मारण्याची धडपड असते?

​कितनी अजीब है ये शहरों की तन्हाई,
भीड़ में भी आदमी खुद को अकेला पाता है।
आईना देखता है हर रोज सुबह वो,
पर अक्स में कोई दूसरा ही नजर आता है...

​             माणूस घराबाहेर पडतो तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी, पण संध्याकाळी घरी परतताना त्याला स्वतःचाच विसर पडलेला असतो. 

नात्यांची अवस्था तर याहून विचित्र झाली आहे.

मागे मी तुला रोमाबद्दल लिहिले होते. 

आठवते? 

तिचं आणि तिच्या सहकाऱ्याचं नातं आता संपलं.

फार शांतपणे.
कुठलाही मोठा प्रसंग नाही. कुठलंही नाट्य नाही. कुणी कुणावर आरोप केले नाहीत. फक्त दोघांनी एकमेकांपासून थोडं मागे सरकायला सुरुवात केली आणि एक दिवस लक्षात आलं—दोघेही आपल्या आपल्या जागी पोहोचले आहेत.
काल कॅन्टीनमध्ये ते समोरासमोर आले.

त्याने तिला पाहिलं.
तिनेही पाहिलं.
दोघांनी हसून मान हलवली.
इतकंच.
मी त्यांच्याकडे पाहत राहिले.

मला त्या क्षणी प्रेम संपल्याचं दुःख झालं नाही.

उलट एक विचित्र आश्चर्य वाटलं.
एखादं नातं इतकं जिवंत असू शकतं आणि नंतर इतकं शांतही.

कदाचित आपल्याला प्रेमाबद्दल एक गैरसमज आहे.

आपण त्याला नेहमी “मिळवण्याशी” जोडतो.
तो माझा.
ती माझी.
आपण एकत्र.
मग त्या नात्याला एक नाव, एक घर, काही नियम आणि काही अपेक्षा मिळतात.
पण एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला आतून बदललं आणि नंतर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहिली नाही, तर त्या अनुभवाचं काय?
तो कमी होतो का?
मला तसं वाटत नाही.

कदाचित काही नाती आपल्यासोबत राहण्यासाठी नसतातच.

ती आपल्यातून जाण्यासाठी येतात.

जसा एखादा ऋतू.

जसं एखादं पुस्तक, जे वाचून झाल्यावर कपाटात ठेवून देतो, पण त्यातलं एखादं वाक्य मात्र अनेक वर्षं आपल्यासोबत चालत राहतं.

​            असो...तू तिथे गेल्यापासून मी कॅनडाबद्दल खूप काही वाचत राहिले आहे. परवाच मी एका जुन्या मासिकात प्रिन्स एडवर्ड आयलंड (Prince Edward Island) ची चित्रे पाहत होते. ती लालसर रंगाची माती, समुद्राच्या लाटांनी कोरलेल्या खडकाळ कडा, हिरवेगार कुरण आणि त्या पार्श्वभूमीवर उभी असलेली लाकडी छोटी घरे! '

             'Anne of Green Gables' मधल्या अ‍ॅनची आठवण झाली. ती निरागस, स्वप्नाळू मुलगी निसर्गाच्या साध्या साध्या रूपांमध्ये कसा आनंद शोधायची! 

कॅनडात आता फॉल सीझन (पानगळ) सुरू होईल ना? मेपलच्या पानांचा 
तो तांबूस, 
सोनेरी आणि पिवळा रंग... 
संपूर्ण जंगल जणू आगीच्या ज्वालांसारखे पण तरीही अत्यंत शीतल भासते असे म्हणतात.

​           तू कधी मॉन्ट्रियल किंवा क्वेबेकच्या जुन्या रस्त्यांवरून चाललास का? तिथली ती युरोपियन धाटणीची दगडी बांधणी, रस्त्यांच्या कडेला असलेली छोटी कॅफेज, आणि हवेत दरवळणारा फ्रेश कॉफी आणि सिनेमनचा सुगंध... तू या सगळ्याचा अनुभव घेतो आहेस की तिथेही फक्त तुझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसून कोडिंग, डेटा आणि प्रोजेक्ट्सच्या जंजाळात स्वतःला हरवून बसला आहेस?


​             जर तू अजून व्हिक्टोरिया पार्क किंवा नायगराच्या धबधब्याकडे गेला नसशील, तर प्लीज, एका वीकेंडला स्वतःला सुट्टी दे. त्या अथांग कोसळणाऱ्या पाण्याच्या गर्जनेसमोर उभे राहा. निसर्गाचे ते अक्राळविक्राळ आणि तितकेच विभोर रूप पाहताना माणसाला स्वतःच्या क्षुद्रतेची नक्कीच जाणीव होत असावी. 
आपल्या चिंता, 
आपले अहंकार, 
आपली प्रतिष्ठा 
आणि आपली मौने... त्या अनंत प्रवाहापुढे किती लहान आहेत हे तेव्हा समजून येत असावे.

तिथल्या लोकांचे जगणे कसे आहे रे? 
आपल्याकडे जसा रस्त्यावर, नाक्यावर माणसांचा जिवंत राबता असतो, भाजी मंडईतला तो आरडाओरडा, चहाच्या टपरीवरची ती गरम चर्चा... ते सगळे तिथे नसते म्हणे. प्रत्येकजण आपापल्या अवकाशात बंदिस्त. 

               मला वाटते, माणसाला भौतिक सुख आणि शांतता मिळाली की त्याला एकांत जास्त खायला उठतो. त्या बर्फाच्छादित रस्त्यांवरून चालताना जेव्हा समोरून एखादी अनोळखी व्यक्ती फक्त हलकेच हसून पुढे निघून जाते, तेव्हा त्या हसण्यात खरी आपुलकी असते की केवळ एक औपचारिक सामाजिक शिष्टाचार?


​             आणि हो, तिकडच्या स्त्रियांबद्दल मी जे ऐकले आहे—त्यांचे स्वातंत्र्य, त्यांचा आत्मविश्वास आणि स्वतःच्या अटींवर जगण्याची त्यांची वृत्ती—हे सगळे तू कसे अनुभवतो आहेस? त्या सौंदर्याचे, 
त्या स्वतंत्र वृत्तीचे...
तुझ्या नजरेतून मला नक्कीच दर्शन घडव. कारण मला माहीत आहे, अमरची नजर केवळ वरवरचे रूप पाहत नाही, तर माणसाच्या अस्तित्वाचा तळ शोधण्याचा प्रयत्न करते.

​          मला कधी कधी वाटते, आपण एकाच नदीच्या दोन पात्रांसारखे आहोत. 
सोबत वाहतो, 
समांतर चालतो, 
पण एकमेकांत कधी मिसळत नाही. 

                कदाचित मिसळलो तर आपल्यातली ही ओढ, हा ताजेपणा संपून जाईल हीच भीती आपल्याला एकत्र येऊ देत नसेल. नदीचे दोन काठ कधी एकत्र येत नाहीत, पण त्यांच्या अस्तित्वामुळेच नदीला प्रवाह प्राप्त होतो. आपलेही तसेच काहीसे आहे का?

​               तू तिथे आनंदी राहा, स्वतःची काळजी घे. कॅनडाची ती बोचरी थंडी अंगात भरू देऊ नकोस. कधीतरी त्या बर्फावर एकटेच चालताना जर पायाखाली बर्फ कुरकुर.... असा आवाज करेल, तेव्हा समजून घे की हजारो मैल दूर बसलेली तुझी सखी तुझ्याशी अबोल संवाद साधत आहे.

​                 पावसाची रिपरिप आता इथे थांबली आहे. खिडकीबाहेर रातराणीचा सुगंध हळूच दरवळू लागला आहे. रात्रीचा अंधार अधिक गडद झाला आहे आणि मन शांत...
​तुझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत, नाही... खरं तर केवळ तुझ्या असण्याच्या जाणिवेत सुखावलेली...!

तुझ्या ऋतूंना स्वतःत साठवून ठेवणारी,
                      सखी






​           

Comments

  1. निसर्ग किती सहजपणे स्वतःला उधळून देतो नाही? 
    त्याला कुठल्याही बंधनाची, 
    परिणामांची किंवा 

    साचलेपणाची भीती नसते. 

    हे वाक्य खूप आवडले...😍😍😍😍😍😍

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 🙏

      Delete
  2. कदाचित काही नाती आपल्यासोबत राहण्यासाठी नसतातच.
    ती आपल्यातून जाण्यासाठी येतात.

    हे जगल्याशिवाय उमगत नाही....आणि तेजू तू अफाट आहेस....तुझे लिखाण नेहेमीच मनाला भुरळ घालते. अतिशय ताकदीने लिहिणारी लेखिका आहेस तू!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला माझे लिखाण भावते हे ऐकुन फार छान वाटले. 😊

      Delete
  3. कितनी अजीब है ये शहरों की तन्हाई, भीड़ में भी आदमी खुद को अकेला पाता है। आईना देखता है हर रोज सुबह वो, पर अक्स में कोई दूसरा ही नजर आता है...✨
    किती गोड लिहिता मॅडम तुम्ही 🥰.
    तुम्ही लिहिलेला प्रत्येक शब्द काही ना काही अर्थ सांगून जातोय.❤️🫂🥰

    ReplyDelete
    Replies
    1. अर्थ शोधता आला पाहिजे....आणि तो प्रत्येक वाचकागणिक बदलत राहतो... आपल्या comment मधून ते वाचताना लेखक म्हणुन भरून पावते....🙏🙏

      Delete
  4. “काही नाती आपल्यासोबत राहण्यासाठी नसतातच, ती आपल्यातून जाण्यासाठी येतात…” ही ओळ मनाला खोलवर भिडली. 👍

    तुझ्या लेखनाची खासियत म्हणजे भावना सांगण्यापेक्षा त्या वाचकाला अनुभवायला लावणे. पाऊस, पानगळ, नदीचे काठ आणि न बोललेली ओढ—सगळंच मनात रेंगाळून राहतं. अप्रतिम लेखन, तेजू! 👍👍👍

    ReplyDelete
  5. खरोखर सुंदर लेख लिहिला आहे...
    तोही अत्यंत ओघवत्या, प्रवाही भाषेत...


    खूपच छान तेजश्री!

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 🙏

      Delete
  6. "कधीतरी त्या बर्फावर एकटेच चालताना जर पायाखाली बर्फ कुरकुर.... असा आवाज करेल, तेव्हा समजून घे की हजारो मैल दूर बसलेली तुझी सखी तुझ्याशी अबोल संवाद साधत आहे."
    अतिशय भावणारी ओळ...आणि तितकीच गहन! प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी सखी असतेच....जी कितीही दूर असली तरी अमर च्या अवतीभोवती वावरताना दिसते.

    कसले सुंदर लिहितेस तू तेजू....नात्यांना समजून घेताना एकदा तरी 'अमर आणि सखी ' नक्कीच वाचावे...!

    ReplyDelete
    Replies
    1. इतक्या सुंदर अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

गझल: रक्तबंबाळ चांदणे

कळून आले (कविता)