तिढा.. जो प्रत्येक स्त्रीला आपआपल्या परीने सोडवत होत जाता येते मुक्त !
तिढा..
ती अनिमिष डोळ्यांनी, शोधक वृत्तीने शोधत राहिली
चाकोरी बाहेरची ऐश्वर्यशाली शांतता..
तिच्या पायाखालचा रस्ता तुडवीत
नेहमीच्याच दिशेने धुंडाळत..
ती प्रवाही होत अनुभवत गेली घटनेची प्रासंगिकता.
तिचे विचार पटत गेले भावनांना
नि हळुहळू वितळत गेल्या मनाच्या गाठी..
ज्या जखडल्या होत्या इतिहासातील गुजगोष्टींशी
परंपरा, संस्कार, संस्कृती यांच्या संकल्पना वापरत.
सरतेशेवटी तिच्या लक्षात आले जीवनाचे गमक
'मी' च्या गुरफटलेल्या पाशात जोपर्यंत 'अहम्' चे होत नाही दहन
ती होऊच शकत नाही मुक्त वैश्विक मोहपाशातून..
स्वतःच्या बुद्धीचा तिढा सोडवत तिला करावे लागेल मार्गक्रमण
अनाहूत सल्ला देणार्या बुद्धाच्या वाटेने असीम आनंद घेत.
असीम आनंद घेत....!!
- तेजश्री शिंदे

Comments
Post a Comment