अमर'चे पत्र..(2) बिफोर व्हॅलेंटाईन ..!
अमर'चे पत्र
सुहृदय सखी,
तुझी सर्व पत्रे मला नियमित मिळतात आणि मी ती पुन्हा पुन्हा वाचली ही. उत्तर न पाठवल्यामुळे कदाचित तुला ती मिळाली का वगैरे वाटलं असेल... आणि प्रत्येक पत्राची स्वतःचीच अंतरिक अपेक्षा असते उत्तराची. पत्र लिहीणाऱ्या माणसाची तर असतेच..! त्यातही ज्या पत्रात मनाच्या अगदी खोलवर असलेलं काढून मांडलं असेल तर उत्तराची वाट देखील मन तेवढ्याच आतुरतेनं पाहतं. हे सगळं पाहता मला उशीरच झाला तुझ्या पत्रांना उत्तर द्यायला. माफी असावी. माझा हा ही अपराध ओठांवर घे...!
तुझे पत्र वाचले. कधी कधी वाटतं तुझे शब्द जे घडलं त्यापेक्षा जास्त उत्कट असतात. अशीच रहा... अनुभवांना ते असतात त्यापेक्षा जास्त समृद्ध करणारी..! मला तुझ्यासारखं अलंकारिक नाही लिहिता येत आणि वरून मला तुझ्यासारखं मोकळं ढाकळं व्यक्त ही नाही होता येत. तरी आज ठरवून लिहायला बसलो.
मुळात तू पत्रात लिहिलं आहेस की मी गेलो वगैरे... मी खरंच गेलोय का???? तुला सांगू, मी एक तर कुठे थांबत नाही. माझा तो स्वभाव नाही. आणि कुठे थांबलो तर तिथून मी पूर्णपणे निघून कधीच जात नाही. अगदी समोरच्याची तशी इच्छा असली तरी. त्यामुळे मी आहे. निश्चिन्त राहा..! आणि मी गेलो असं वाटून आटलेल्या कवितांच्या प्रवाहाला परत वाट करून दे. आणि मुळात कवितांचा तो झरा सर्वस्वी तुझा आहे हे मनाला निक्षून सांग. तो प्रवाही व्हायला मी कारण झालो असेल कदाचित पण म्हणून तो माझा होत नाही. त्यामुळे मला त्याचं फक्त कारण च राहूदे मला त्याचा उगम नको करू. मी आहेच. पण जरी कधी मी गेलोच तरी तो प्रवाह सुरू ठेव. कारण तो ओलावा तुझ्या - माझ्या असण्या पलीकडचा आहे. तो टिकलाच पाहिजे. नाहीतर आत्ता त्याच्या वाहण्याचा अर्थ ही काळाबरोबर नाहीसा होईल. ते तेवढं होऊ देवू नकोस.
आणि बहराचं म्हणशील तर तो किती वेळ चालला आणि किती वेळा आला याला फारसं महत्व नाही... जेवढा वेळ होता तेंव्हा तो किती उन्मादाने बहरला ते महत्वाचं..! आणि तुझ्या सोबत तर..."एकाच वेळी ग्रीष्माचा दाह, वर्षेची बेधुंदी, वसंताची नवलाई, शरदाचं निरभ्र आकाश सगळं अनुभवलं बघ... मी तरी."
मुळात तू एक विलक्षण रसायन आहेस. मला नाही जमणार तुला शब्दबद्ध करायला. किंबहुना मी तसा प्रयत्न सुद्धा करणार नाही. पण तुझ्या डोळ्यांनी एक वेगळं जग दिसलं. असंही नातं जगात असू शकतं हे समजलं. तुझ्या प्रेमापेक्षा मला त्यातला निरपेक्षपणा जास्त भावला. हे असं कोणाला जमू शकत असेल का..?? असं ...तू कळण्यापूर्वी मला कोणी विचारलं असतं तर...मी छातीठोकपणे नाही सांगितलं असतं. म्हणजे या एकूण गुंत्याच्या अगदी केंद्रस्थानी आणि भावनेच्या अगदी टोकावर असतानाही तुझं स्थितप्रज्ञ असणं आवडलं नसतं तर.. मी अगदीच अरसिक ठरलो असतो. तसा मी तुला वाटलो च असेन.. अरसिक. नाहीतर सोनचाफ्याचा सुगंध घ्यायचा सोडून त्याच्या फक्त सौंदर्यावरच कोण थबकेल? पहिल्या पावसात भिजायचं सोडून खिडकीशी उभं राहून त्याला फक्त न्याहाळत कोण बसेल?
मी उत्तर द्यायला केलेल्या उशिराचं तुला फारसं काही वाटलं नसेल. कारण जेवढं तू मला ओळखतेस त्यावरून मी उत्तर लिहीन का हाच प्रश्न तुला पडला असेल. पण आज मात्र तुझं उत्तर लिहीत आहे. मिळेल तुला दोन चार दिवसात. ते वाचून पण तुझा अपेक्षाभंग च होईल...कारण यातही माझं व्यक्त होणं अगदी चाकोरी बद्ध असेल. आपलं म्हणजे असं झालंय.."पृथ्वी ओलांडून विहारणाऱ्या फ्लेमिंगो नि एखाद्या डबक्यात रमणाऱ्या अडई च्या प्रेमात पडावं...." पण असो. माझ्या अव्यक्त राहण्याची माझी माझी कारणं आहेत. कारणं माझी आहेत पण त्यामागचा विचार न काळजी तुझीच असते. मी कुठपर्यंत चालेन याचीच शंका मला असते... म्हणून मग कुठपर्यंत बोलायचं यावरच मी मर्यादा घालतो बघ. आणि बहुतेक वेळा जास्त व्यक्त झालं की मजा राहत नाही गं. काही गोष्टी अपूर्ण च मनमोहक वाटतात तसं. त्या अपूर्ण असल्या तरी त्यांचं अस्तित्व तेवढंच ठसठशीत कोरलं जात मनावर हे तू लक्षात ठेव.
आणि हो माणूस म्हणून मला आणि माझ्या विचारांना समृद्ध केल्या बद्दल तुझे आभार मानावे वाटतात. पण मी ही तुला काही शाश्वत देऊ शकलो याचा फार आनंद आहे. शेवटी (या पत्राच्या) एवढंच सांगेन की.. मी आहे... येत राहीन... अचानक वळीवाच्या पावसासारखा. आणि तू तेंव्हा फक्त न्याहाळत न बसता मनसोक्त भिजशील हे मला पक्के माहीत आहे. अशीच बहर कोणत्याही बाह्य प्रेरणेशिवाय! आनंदी राहा!!

सुंदर, अप्रतिम, शब्दांची गुंफण करून केलेला फुलांचा गजरा
ReplyDeleteअमरने प्रेमाने सखी साठी माळलेला... सुगंधी शब्दांचा गजरा!
Deleteअतिशय सुंदर
Deleteशब्दाची सुंदर अशी मांडणी तु केली त्या बद्दल तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे
प्रेम पत्र नव्हे.... प्रेमानं प्रेमास लिहलेले पत्र होय !!!!! जे हृदयाचा छेद घेऊन गेले....
ReplyDeleteThank you.
Deleteछानच पत्र!
ReplyDeleteGeetesh.. थोड सविस्तर सांग की... छान आहेच पण तुझ्याकडून समीक्षेची अपेक्षा आहे l.
Delete
ReplyDeleteनदी जेव्हा वाहते तेव्हा
तिच्या जवळ नकाशा नसतो
की समुद्र कुठे आहे
विना नकाशा ती सागरापर्यंत पोहचतेच
अप्रतिम पत्र आहे,,,,,
अगदी खर आहे....अमर म्हणजे खळाळणारी नदी आणि सखी म्हणजे समुद्र आहे.
DeleteFaarch chhan, Apratim.
ReplyDeleteThanks Poonam
DeleteAapki writing kabile tarif hai,,jazbaton ko awaz de jati hai....
ReplyDeleteकुछ किस्से हमने भी जिए है.. पूरी शिद्दत से... उन्हीं को शब्दों मैं पिरोकर आपके सामने ले आते है।
DeleteVery nice 👌👍
ReplyDelete' लिखाण ' म्हणजे नदी , समुद्र , आकाश .... यांच्याही पलीकडे जाऊन व्यक्त-अव्यक्त आनंद देणारी कल्पनांची भरारी . परिपक्वतेच्या शिखरावर जाणाऱ्या योग्य पायऱ्यावरील वाटचाल आहे , तेज-श्री .
ReplyDeleteआपले नाव दिसत नाही आहे ब्लॉग वर..पण आपण लिहिलेल्या चारोळी करता अनेक धन्यवाद!
Deleteमस्त हो लिखाण👌👌👍
ReplyDeleteThank you.
Deleteतुझं हे before valentine's मला थोडे जड गेले teju. पहिली गोष्ट तुझी सगळी पत्र एका बाजुला आणि अमर चे उत्तरादाखल चे पत्र एका बाजूला ठेवले तरी या अमरच्या पत्राच पारडे जड होणार नक्की. याच कारण अस आहे, या पत्राची सुरवत तू केली आहेस ते पत्राचे उत्तर आणि लिहिणाऱ्या ला असणारी त्याची उत्कटता. त्यांनतर च्या ओळी घेवून येतात भावनांना समृध्द करणारी अलंकारिक लीहणारी तू अशी ती तुझी स्तुती.
ReplyDeleteमग सुरू होतात अमरच्या भावना तो आपल्या स्वभवाबद्दल सांगतो. भूत भविष्य यांचे वर्णन करतो तुझ्या कवितेचा उगम आणि प्रवाह सांगतो त्या प्रवाहित होण्याचे कारण तो स्वतःला मानतो आणि ती प्रवाह निरंतन राहून त्याचा ओलावा आयुष्यभर टिकून राहावां अशी आशा व्यक्त करतो.याचबरोबर तो तुझ्यासोबत बहरण, झडण आणि भिजण हे सुद्धा स्पष्टपणे सांगतो. तू एक अद्भुत रसायन आहेस हे वास्तव देखील तो अगदी प्रेमाने सांगतो. (फ्लेमिंगो पक्षी आणि डबके ही तुलना मला समजली नाही हे मान्य करतो मी तू ती मला स्पष्ट करून सांगशील). तो निघून न गेल्याचे मान्य करतो आणि पुन्हा पुन्हा पावसाच्या रुपात येण्याचं वचन देतो, फक्त अट अशी आहे की तू खिडकीतून डोकावून न पाहता चिंब भिजायचं. आणि जाता जाता तो शुभेच्छा देतो तुला अशीच बहर कोणत्याही बाह्य प्रेरणे शिवाय.. क्या बात है. पुन्हा तेच शब्द वाचून वरवर सुंदर वाटणारे हे गुलाबाचे फुल वास्तवात मात्र फार भयानक अश्या भावनिक गर्तेचा एक न सोडवला जाणारा गुंता आहे असा सुगंध देणारा आहे. खूप वेळ वाचवे लागले आणि त्यामुळे अभिप्राय उशिरा आला हे तू समजुन घेशील ही खात्री. शुभेच्छा सह आणि पुढच्या लिखाणाच्या उत्कटता सह..
लेखक म्हणून एखादे पात्र उभे करताना सर्वार्थाने कस लागतो... अमर आणि सखी यांच्या पत्रांची मी सिरीज लिहिल असे कधीच वाटले नव्हते. माझ्या लिखाणातून काही निराळी नाती... जी आपण जगतो अनुभवतो परन्तु त्याला घेवून कधीच बोलत नाही...अशी नाती अनेक दृष्टीने जीवन समृद्ध करत असताना... मी या प्रवासात अशाच काही नात्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे... बघू जमतय का..
ReplyDeleteअमर गेलेला नाही ही चांगली गोष्ट.
ReplyDeleteअमर सखीला जे उत्तर देतोय ते तोडीस तोड आहे. त्याने केलेलं, वर्णन, दिलेल्या उपमा निव्वळ अप्रतिम..
व्हॅलेन्टाईन च्या दिवशी दोघे एकमेकांना काय पत्र लिहितात, काय भावना व्यक्त करतात हे पाहण्याची उत्सुकता
धन्यवाद सुहास... त्यांच्या आयुष्यात वेलेंटाइन कधी येतोय याची मलाही उत्सुकता आहेच... पण हे नात त्या प्रेमापलीकडचे आहे. अनेक अंगांनी ते हळूहळू खुलत जाईल.
Deleteअमर.. हा.. त्याचा ज्या भावना आहेत. सखी साठी तो ह्या पत्राद्वारे सांगत आहे. जिथं सखी ला वाटत आहे की अमर गेला आहे परंतु अमर हा सखीसोबत आहे. त्यांचं जे नातं आहे ते तसच राहूदे. जरी अमर आणि सखी या दोघांन मध्ये दुरावा आला तरी त्या दोघांचं नातं हे नदीच्या प्रवाह सारखं असल पाहिजे.
ReplyDeleteजेवढा वेळ होता तेंव्हा तो किती उन्मादाने बहरला ते महत्वाचं..! ह्या ओळी मध्ये एक तर नक्कीच समजले की एखादी व्यक्ती रोज सोबत आहे की नाही. पण त्या व्यक्ती सोबत घालवलेले क्षण आणि त्या क्षणामध्ये त्यानं दिलेली साथ, आपलेपणा,...
अमर.. हा.. जरी व्यक्त होत नसला तरी त्याचं जे प्रेम आणि काळजी आहेच. तसे गरज नसतेच की एखाद्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे हे दाखवून द्यायची. प्रेम शब्दातून बोलून नाही तर काही न बोलता सुद्धा कळते.
एवढंच सांगेन की.. मी आहे... येत राहीन... अचानक वळीवाच्या पावसासारखा. आणि तू तेंव्हा फक्त न्याहाळत न बसता मनसोक्त भिजशील हे मला पक्के माहीत आहे. अशीच बहर कोणत्याही बाह्य प्रेरणेशिवाय! आनंदी राहा!! (Beautiful lines..)
खूप छान आहे पत्र!!❤️
सखी चे उत्तर हवे आहे आता ☺️
रिया....तू हे समजून घेत आहेस हे महत्वाचे. कारण ही फक्त भावनिक गुंतागुंत नाही आहे... यात वैचारिक चौकटीला छेद देत नवीन विचारसरणी चा स्विकार देखील आहे... पत्र वाचून विस्तृत केलेल्या अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद.
Delete🥰अमर आणि सखी 🥰 👌👌🍁
ReplyDeleteThanks dear
Deleteअप्रतिम 👌
ReplyDelete"पृथ्वी ओलांडून विहरणाऱ्या फ्लेमिंगोनी एखाद्या डबक्यात अडईच्या प्रेमात पडावं."
ReplyDeleteफारच छान!!!
Thank you 😊
Deleteतेजु तुझी सगळी पत्र मी अगदी मनापासून वाचते.सगळीच पत्र खूपच सुंदर असतात. अमर ने सखीसाठी असलेल्या भावना खुप छान पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. तो सांगतो की मी तुझ्या बरोबरच आहे.त्यांचे जे नातं आहे ते तसेच राहू दे.त्यांचे हे नातं त्याने न बोलता व्यक्त केले आहे. त्यांचे हे नाते असेच बहरू दे...खुपच सुंदर आहे हे पत्र आणि तुझे खुप खुप अभिनंदन आणि खुप खुप कौतुक...
ReplyDelete