माणूस ओळखून ठार मारले गेले.



माणूस ओळखून ठार मारले गेले.


आता माणूस असणं धोकादायक झालंय...
जिवंत असताना मृत्यूसाठी पात्र ठरवायचं काम
एका नावाने, एका धर्माने, एका प्रश्नाने होतंय.
"तुमचं नाव काय?"
हा प्रश्न आता तुमचं आयुष्य ठरवतो.
पण उत्तरात 'माणूस' म्हटलं,
तर त्या उत्तरालाच गोळी घातली जाते.


कधी वाटायचं
की "माणूस" ही ओळख पुरेशी आहे...
पण हल्ली तीच ओळख
जीवघेणी ठरते आहे.


डोळ्यांत आता ममत्व नाही, माणुसकीचा ओलावा नाही..
तिथं आहे फक्त एक थंड तपासणी.
एखाद्या सीसीटीव्हीसारखी नजर —
जी सतत विचारते,
"तू कोण? कुठल्या बाजूचा?"
आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत
प्रत्येक स्पंदनाला संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं.


ज्यांनी डोंगरात फुलं शोधायला पाय ठेवले,
त्यांच्या हातात अखेर तिरडीचे हार आले.
ज्यांनी थोडा निवांत श्वास घ्यावा म्हणून
हिरव्याकंच हिरवळीत पाऊल ठेवलं,
त्यांचं शेवटचं छायाचित्र
गेल्या बातम्यांमध्ये "अपरिचित मृतदेह" म्हणून दाखवलं गेलं.


त्या फोटोत दिसणाऱ्या पोरीच्या डोळ्यांत
न शांतता आहे, न अश्रू —
तिथं आहे एक भेसूर थांबलेली वेळ,
जी किंकाळीत व्यक्त न होता
फक्त नजरांनी ओरडते आहे.


ती नजर बोलत नाही,
पण तिचं प्रत्येक पापणं हलणं
"का?"  — असं का घडलं?
आणि मी अजून श्वास घेत आहे —
याचंच अपराधीपण खातं आहे.


मारणाऱ्याच्या धर्मावर बोलायचं नाही,
मरणाऱ्याच्या धर्मावरही नाही.
पण
माणूस मारला गेला
हे बोलायला मात्र आजही
हिम्मत लागते ?


                                                  -तेजश्री शिंदे ✍️

Comments

  1. Replies
    1. तुमचं लिखाण अतिशय प्रभावी, अंतर्मुख करणारे आणि काळजाला भिडणारे आहे. यातून व्यक्त होणारी वेदना ही केवळ एका घटनेची प्रतिक्रिया नाही, तर एका संपूर्ण पिढीची अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना आहे.

      पण या अंधाराच्या गर्भातच प्रकाशाची पहाट लपलेली असते.

      या कवितेतून ज्या प्रश्नांची गुंज आहे—"का?" "माणूस असणं इतकं अवघड का?"—त्यांची उत्तरं आपणच शोधायची आहेत. आणि ती उत्तरं केवळ संतापात नाहीत, तर सहवेदनेत, संवादात, आणि माणुसकीच्या पुनर्स्थापनेत आहेत.

      हो, आज "माणूस" असणं धोकादायक वाटतं, पण त्याचवेळी "माणूस" असणं हीच आपल्या जगण्याची सर्वात मोठी ताकद आहे. कारण हिंसा, द्वेष, आणि असहिष्णुतेच्या या प्रवाहासमोर जर काही उभं राहू शकतं, तर ते प्रेम, करुणा, आणि माणुसकीचं कवच आहे.

      आपली ही ओळख जपणं — एकमेकांमध्ये तो "माणूस" शोधणं, हेच आजचं सगळ्यात मोठं उत्तर आहे.
      आपलं शब्दांद्वारे असं स्पष्ट, ठाम आणि संवेदनशीलपणे सत्य मांडणं — हेही एक प्रकारचं सामाजिक जागरणच आहे.

      तुमचं लेखन चालू ठेवा. शब्दांचा हा उजेड अनेकांना जागं ठेवू शकतो.

      Delete
  2. Hey lekhan Khup kahi bolun gelat maanus pn kami dhramavr dast avlambun rahnari hi duniya chi saty tumhi sabdatun vyakt kele

    ReplyDelete
  3. हा फोटो पाहताना डोकं सुन्न झालय... मनामध्ये प्रचंड राग... डोळ्यांमध्ये पाणी... हेलावून गेलेले अंत:करण... आणि आजूबाजूला फोटो सारखीच भयानक निरव शांतता... अशी विचित्र मानसिक अवस्था अनुभवतोय.
    पण...
    = आता ही 'वादळपूर्वीची' शांतता ठरावी...
    = निश्चल, शांत बसलेल्या या लेकीच्या 'निशब्द' प्रश्नांच्या आवाजाने आता सर्वांच्या कामाचे पडदे फाटावेत...
    = 'तांडव' काय असते हे आता पहायला मिळावे. दहशत काय असते हे दाखवून द्यावे...
    = प्रत्यक्ष गुन्हेगारांसोबत,त्यांचे मालक, हितचिंतक व सहानुभूतीदार यांची त्यांच्या कुटुंबीयासमोरच 'रंगपंचमी' करावी...
    = आता जे काही व्हायचे ते होवुद्या आणि त्याला जे म्हणायचे ते म्हणूद्या... एकदाचा "निकाल" लावाच...

    ReplyDelete
  4. निःशब्द!

    ReplyDelete
  5. 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥹🥹🥹🥹🥹

    ReplyDelete
  6. माणूस म्हणून घेण्याची लाज वाटावी अशी घटना

    ReplyDelete
  7. मंगेश23 April 2025 at 23:51

    खूप मार्मिक अन्‌ हृदयस्पर्शी शब्दांत आदरांजली वाहिली आहेस, तेजू! 🌹🙏
    मन अतिशय सुन्न करणारी घटना!. धर्म अन्‌ अधर्म च्या लढाईत पराभव झाला तो माणुसकीचा! सांडलेलं रक्त तर फक्त लालच होतं ना? रक्त बघून धर्म सांगणारे अन्‌ धर्म बघून रक्त सांडणारे ह्यांच्यात फरक तो काय?

    कालच कुणीतरी बोललं होतं!..
    नाना रंगांच्या रक्ताच प्रदर्शन भरलंय म्हणून..
    हिरवं रक्त, पिवळ रक्त, निळ रक्त अन् लाल रक्त..

    बघायला आलो वेळ साधून रस्त्यावर पण
    लाल रक्ताशिवाय इथे दुसरं काहीच दिसत नाहीय!

    कालच कुणीतरी बोललं होतं..
    नाना रंगांच्या रक्ताच प्रदर्शन भरलंय म्हणून?!

    खोटं बोलला असावा भाबडा
    की मलाच फक्त एक रंग दिसतोय?

    हेच का ते हिंदूंचं, हे मुसलमानांचं अन् हे शिखांचं
    छे.. काहीच उमजत नाहीय..

    अन् ते काय दिसतंय कोरड्या रक्तात गुरफटलेलं?
    एका माऊलीचं काळीज तर नाही ना?

    पोटच्या मुलाच्या रक्ताचं प्रदर्शन
    बघायला आली असावी भाबडी
    अन् आपलं काळीजच विसरून गेलेली दिसतेय!

    कालचा काळीजाबद्दल तर काहीच बोलला नव्हता!
    अन् त्यालाच कसे दिसले नाना प्रकारचे रंग?

    कोणी रक्ततज्ञ तर नव्हता ना?
    लाल रक्तातलं हिरवं निळ पिवळपण जाणणारा..
    रक्त बघून धर्म सांगणारा..

    नाहीतर रक्तातल्या रंगछटा
    त्यालाच बरं कश्या दिसून आल्या?
    😭😭😭

    ReplyDelete
    Replies
    1. Tejashri shinde24 April 2025 at 09:11

      कालच कुणीतरी बोललं होतं..
      नाना रंगांच्या रक्ताच प्रदर्शन भरलंय म्हणून?!

      निःशब्द!

      Delete
  8. “वर्दीत कर्तव्य निभावताना माणुसकीची ही ठाम बाजू… खूप गरजेचं आणि धाडसी लिखाण मॅडम.”
    “‘माणूस’ असणं गुन्हा ठरत चाललंय, हे इतक्या स्पष्ट शब्दांत मांडण्याची हिंमत फार थोड्यांत असते. सलाम.”
    “शब्द नाहीत… फक्त सुन्न करणारी सत्याची थेट झणझणीत जाणीव.”
    “देशसेवा करताना समाजाचं आरसपानी दर्शन घडवणारी लेखणी—मन हेलावलं.”
    “धर्म, नाव, बाजू यापलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून प्रश्न विचारणं—खूप गरजेचं लेखन

    ReplyDelete
  9. मॅडम वर्दीत असून अप्रतिम लेखन आहे
    सदरची घटना माणुसकीला काळीमा फासली आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)