Selfie...( पाहण्याची नवी नजर)

 Selfie : नजरेत अडकलेली प्रतिमा

             

              आज selfie हा शब्द इतका सामान्य झाला आहे की, तो उच्चारताच आपोआप एक कृती आठवते. फोन हातात घेतला जातो, कॅमेरा उघडला जातो आणि क्षणात एक प्रतिमा टिपली जाते. आपण त्या प्रतिमेकडे पाहतो, थोडं समाधान मानतो आणि पुढच्या कामात गुंतून जातो. पण selfie ही केवळ कृती नाही; ती आपल्या काळाची एक सवय आहे.

                ही सवय माणसाला सतत दिसत राहण्याची, नोंदवले जाण्याची आहे. जिथे शब्द थांबतात, तिथे प्रतिमा बोलू लागते. कधी ती आनंद दाखवते, कधी उत्साह, तर कधी केवळ “मी इथे होते” याची खूण. selfie म्हणजे आपल्या अस्तित्वाची एक छोटीशी सही असते.

                 काही वेळा selfie ही गर्दीतून स्वतःला वेगळं करून दाखवण्याची गरज असते. आपण कुठे होतो, कोणासोबत होतो, हे सांगण्याची. पण त्याचवेळी ती एक शांत इच्छा देखील असू शकते— कोणाच्या नजरेत आपण कसे दिसतो, हे जाणून घेण्याची. त्या नजरेत आपल्याला ओळख मिळते, स्वीकार मिळतो.

                 आधुनिक आयुष्यात सगळं वेगात आहे. संवादही, नातीही, भावना देखील. अशा वेगात selfie ही एक हलकीशी थांबवणारी खूण ठरते. ती मोठा संवाद घडवत नाही, पण एक उपस्थिती नोंदवते. ती काही सांगत नाही, पण काहीतरी आठवणीत ठेवते.

                 म्हणूनच selfie कधी कधी फोनमध्ये राहत नाही. ती मनात साठते. कारण काही प्रतिमा दाखवण्यासाठी नसतात; त्या लक्षात राहण्यासाठी असतात. काही अनुभव शब्दांपेक्षा वेगळ्या भाषेत व्यक्त होतात.....

*********



"एक selfie plz...!"


तो धावतो त्याच्या जगाच्या वेगात,

ती विसावते त्याच्या क्षणांच्या सावलीत..


ती मुद्दाम काहीच थांबवत नाही,

त्याची धावपळ, त्याची गडबड,

त्याचं चालू असलेलं आयुष्य—

सगळं जसं आहे

तसंच राहू देते.


फक्त कधी कधी

हळूच म्हणते— selfie?


कारण त्या चौकटीत,

तो तिला निवडतो,

आणि बाकी सगळं

क्षणभर थांबतं.


त्या एका क्षणात

वेळ घड्याळ विसरते,

अवकाश

स्वतःचाच श्वास धरून

उभं राहतं.


तो हसतो...

आणि त्या हसण्यात

त्याच्या सगळ्या धावपळीचा थकवा

क्षणभर

तिच्या डोळ्यांत उतरतो.


ती काहीच मागत नाही—

ना शब्द, ना वचन,

ना उद्याचं आश्वासन..

फक्त तो क्षण,

जिथे तो जाणून

तिच्यासाठी थांबतो.


त्या फोटोमध्ये

आपण कधी जवळ उभे नसतो,

पण अंतरालाही

अर्थ उरत नाही.


तो परत त्याच्या वेगात मिसळतो,

ती परत तिच्या शांततेत विरघळते...


पण त्या चौकटीत बंद झालेला क्षण

आजही तिच्याशी 

हळूच बोलत राहतो.


- तेजश्री शिंदे ✍️ 


Comments

  1. वाह.... अप्रतिम

    ReplyDelete
  2. अतिशय सूक्ष्म भावनांना मोजक्या शब्दांत पकडणारी कविता. न बोलता बोलणारे क्षण, अंतरातही जवळीक निर्माण करणारी मांडणी आणि शेवटपर्यंत मनात रेंगाळणारी शांत भावना — लेखणीला मनापासून दाद. असंच संवेदनशील लिखाण करत राहा तेजू ✍️✨”

    ReplyDelete
  3. Excellent description of selfie.........moral of the story is that it is a quiet way of saying:
    I exist
    This moment matters,
    This feeling deserves to be remembered. ❤️❤️❤️❤️❤️❤️ Lovely.

    One more moral is that we need to take more selfie☺️

    Thanks for remembering me .......off late I have stopped this , disconnected from myself.

    ReplyDelete
  4. अप्रतिम

    ReplyDelete
  5. “एका फोटोमध्ये बंद झालेला क्षण इतकं काही सांगू शकतो, याचं सुंदर उदाहरण.”

    ReplyDelete
  6. अप्रतिम

    ReplyDelete
  7. खूप छान..... तेजश्री

    ReplyDelete
  8. थांबवून ठेवणारी कविता ❤️

    ReplyDelete
  9. खूप छान लेख लिहिले तुम्ही माझ्या काल झालेल्या वाढदिवसाच्या छोटा क्षण अगदी कमी वेळेत जास्त आनंद झाला मला अलगद selfie घेऊन ती आठवण माझ्याकडे आहे ♥️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.