वळणाने ठरलेली भेट (कविता)
वळणाने ठरलेली भेट
जुळल्या अशा दोन वाटा,
आयुष्याच्या वळणाशी..
वळणानेच ठरवलं सगळं,
कारणं मात्र
दोघांच्याही ओठांवर
कधीच उमटली नाहीत.
भेट ही निवड नव्हती,
ना जाणीवपूर्वक कृती..
ती घडली,
जशी संध्याकाळ
हळूच सावली वाढवत जाते,
कुणालाही न विचारता.
एकमेकांत
हरवण्याचा मोह झाला,
पण स्वतःला गमावण्याइतपत
तो कधीच वाढला नाही..
म्हणूनच ही ओढ
इतकी शांत राहिली.
जवळीक होती,
जशी दोन झाडांच्या सावल्या
थोडा वेळ एकमेकांत मिसळतात,
पण मुळं मात्र
आपापल्या मातीशीच घट्ट असतात.
काही न सांगता,
काही न मागता,
जसं लाटांनी
किनाऱ्याला अलगद स्पर्शून
मागे फिरावं..
एकमेकांच्या अस्तित्वाला
थोडंसं गाठून
पुन्हा आपापल्या दिशांनी
निघून जाण्यातच
या जुळण्याचं
खरं पूर्णत्व होतं..!

Nice mam 👍
ReplyDeleteThank you 😊
Deleteजीवनाचे हेच अस्थित्व आणि हेच आहे सत्य खूप सुंदर......
ReplyDeleteThank you 😊
Deleteदोन पावले एकमेकांना भेटली,
ReplyDeleteजुळले नकळत हृदयाचे धागे,
पण फिरूनही निघाले आपल्या दिशेने,
जुळले ते क्षण, जुळले ते बंध,
पण जुळले नाही ते दोन हृदये एकमेकांना.
दोघे भेटले, दोघे निघून गेले,
पण राहिले ते स्मृतीचे धुके,
जसे वाऱ्याने उडालेले पान,
जसे नदीच्या किनारी लिटलेले तरंग,
जसे आकाशात मिटलेले तारे.
Thank you 😊
Deleteखूपच सुंदर
ReplyDeleteVery nice 👍
ReplyDeleteखूप सुंदर 💯
ReplyDelete