रूपकगद्य ...भावनांचे रूपांतरण करणारा लेखनप्रकार!
रूपकगद्य
भावनांचे रूपांतरण करणारा लेखनप्रकार
(प्रस्तावना)
पोलीस खात्यात दैनंदिन कामकाजातून वेळ काढून दररोज लिहिता येणे थोडे कठिणच...पण हक्काची सुट्टी मिळाली की घर आणि नोकरी सोडून स्वतःला असा वेळ देणे म्हणजे लिखाण आणि वाचन करणे...हे सोयीने आलेच...म्हणुनच लागोपाठ हा दुसरा ब्लॉग लिहीत आहे. 😊😊
मागील ब्लॉग मध्ये आपण "अलक" हा लेखनप्रकार आणि त्याची गुण वैशिष्ट्य पाहिली. साहित्यामध्ये काही लेखनप्रकार असे असतात, जे सहज वर्गीकरणात बसत नाहीत. ते कविता नाहीत, कथा नाहीत, आणि निबंधही नाहीत— परंतु या तिन्हींचे सुंदर आणि सूक्ष्म गुण त्यांच्यात मिसळलेले असतात. "रूपकगद्य" हा असाच एक अद्वितीय लेखनप्रकार आहे—गूढ, काव्यमय, आणि प्रतीकांनी भरलेला.
अलक आणि रूपकगद्य हे दोन्ही काव्यमय लेखनप्रकार असले तरी त्यांची अभिव्यक्ती वेगळी असते. अलक हा अत्यंत मितभाषी, सूचक आणि एका क्षणावर आधारलेला प्रकार आहे...जिथे शब्द कमी, पण अर्थ खोल असतो; भावना थेट न सांगता केवळ संकेतांनी जाणवू दिली जाते. रूपकगद्य मात्र एका प्रतीकावर उभं असलेलं विस्तृत, थरांच्या खोलात जाणारं गद्य आहे, ज्यात संपूर्ण लेख त्या प्रतीकाच्या माध्यमातून उलगडतो. अलक क्षणाच्या हलक्याशा झुळुकीसारखा असतो, तर रूपकगद्य त्या झुळुकीत दडलेल्या पूर्ण वातावरणाचा अंतर्मुख प्रवास उघड करतं. एका वाक्यात सांगायचं तर...अलक क्षण पकडतं, आणि रूपकगद्य विश्व उलगडतं.
रूपकगद्याचा केंद्रबिंदू रूपक असतो—एखादी वस्तू, दृश्य, ऋतू, सावली, प्रकाश, पाऊस, संध्या… अशी कोणतीही गोष्ट जी प्रत्यक्षात एक असते, पण तिच्या आड अनेक अर्थछटा उलगडत जातात. संपूर्ण लेख एका प्रतीकावर उभा असतो, आणि त्या प्रतीकाच्या माध्यमातून लेखक अनुभव, भावना, आठवणी किंवा जीवनातील एखादा सूक्ष्म तत्त्वज्ञान सांगतो. यात शब्द गद्याचे असतात, पण त्यांची चाल कविता जशी लयदार आणि भावप्रधान असते तशी असते.
या प्रकाराची खासियत म्हणजे....अर्थ नेहमीच थरांमध्ये उलगडतो. वाचकाला सांगितलं जात नाही, पण सूचित केलं जातं. लेखन सरळ वर्णनात्मक नसून प्रतिमांवर आधारित असतं. एक पान, एक खिडकी, एक प्रकाशरेषा..ही सर्व प्रतीकं रूपकगद्यात एखाद्या भावनेचं, स्थितीचं किंवा आंतरिक हालचालीचं रूप धारण करतात. शब्दांपेक्षा शब्दांमधली शांत जागा, प्रतिमांमधली सूचकता, आणि अर्थाच्या धूसरतेतून उठणारी भावना..ही रूपकगद्याची खरी ताकद आहे.
खाली दिलेलं रूपकगद्य “संध्याकाळ” या गूढ, अर्धवट आणि भावपूर्ण प्रतीकावर आधारित आहे. जिथे प्रकाश आणि अंधार यांच्या दरम्यान उभा राहणारा एक क्षण, स्वतः माणसाच्या मनातला एक अंतर्मुख अवकाश बनतो.
*******
रूपकगद्य — “संध्याकाळ"
संध्याकाळ नेहमीच माझ्या खिडकीपाशी येऊन बसते. तिच्या हातात काही नसतं....न उजेड, न अंधार; फक्त त्या दोघांच्या मधली एक हलकीशी रेषा, जिच्यावर मी काही क्षण स्वतःला टेकवू शकते. दिवसाचा प्रकाश थकलेला असतो, तर रात्रीचा अंधार अजून तयार नसतो. या दुरावलेल्या दोन टोकांच्या मधली ही सौम्य शांतता—हीच संध्याकाळ...मला नेहमीच जवळची वाटते.
ती मला काहीच विचारत नाही. काहीच सांगत नाही. ती फक्त आपल्या रंगांच्या शांत स्पर्शात माझ्या मनाला अलगद मिसळू देते.
कधी राखाडी,
कधी जांभळी,
कधी अगदी रंगहीन.
या प्रत्येक रंगात माझ्या दिवसाची धावपळ हळूहळू विरघळत जाते, आणि माझ्या आतली विस्कटलेली लय पुन्हा सरळ होत जाते.
संध्याकाळ ही फक्त सूर्य मावळण्याची वेळ नाही;
ती आपल्या आयुष्यातील त्या क्षणांची प्रतिमा आहे,
जिथे आपण थांबतो, थोडे गोंधळतो,
किंवा एखाद्या भावनेला नेमकं नाव देऊ शकत नाही.
प्रकाश मागे सरकलेला असतो, अंधार पुढे टेकलेला असतो आणि आपण त्या दोघांच्या मधल्या एका अदृश्य रेषेवर उभे राहून स्वतःलाच शोधत असतो.
आजही संध्याकाळ आली होती...नेहमीच्याच शांततेने, पण वेगळीच जाणिव देत. तिच्याकडे पाहताना आत काही हलकंसं ढवळून निघालं. कळलं.
तरी आपल्या मनातली संध्याकाळ आपल्याला नेहमीच एखाद्या सौम्य, गूढ शांततेकडे घेऊन जाते.
आपल्यालाच परत बोलावते.
कधी कधी ती मला तिच्या काठावर बसवते...तिथे, जिथे प्रकाशाचा शेवट आणि अंधाराची सुरुवात एकमेकींच्या खांद्यावर विसावतात. त्या सीमारेषेवर उभं राहिलं, की जाणवतं— आयुष्यही असंच असतं.
दोन टोकांच्या मधल्या शांत तिसऱ्या प्रदेशात आपले खरे निर्णय जन्म घेतात.
जिथे आपण स्वतःशी प्रामाणिक असतो.
जिथे काहीही लपवण्याची गरज नसते.
जिथे आतल्या गोष्टी स्वतःच आपल्यापर्यंत चालत येतात.
ती तिच्या मंद उजेडाच्या धुक्यात कुजबुजते... “तुझ्यात जे थांबून राहिलं आहे… ते ऐक.”
जीवनाचा सर्वांत खराखुरा उजेडही इथेच असतो.. जिथे काही सिद्ध करायचं नसतं, काही पळायचं नसतं, आणि आपण फक्त आपण राहू शकतो.
संध्याकाळ दररोज माझ्याकडे येते...नवीन काही न देता, पण जे हरवलं होतं...ते पुन्हा शोधायला मदत करत..!

वाह... लाज़वाब! तुझे लिखाण दिवसेंदिवस बहरत आहे.
ReplyDeleteसंध्याकाळ.... इतकी सुंदर आणि चिंतनशील असू शकते हे पहिल्यांदाच समजले. 👏👏👏👏👏👏👏👏✍️👌
ReplyDeleteMast tumch lekh mhnje kaunala tari motivate kart divasbharachi dhavpal karun kas aapun swata la shodat asto hey tumhi mast ya lekhatun spast kel aahe🙂💯
ReplyDeleteVery nice 👍
ReplyDeleteVery very nice madam
ReplyDeleteSundar.. Apratim...
ReplyDeleteखुपच सुंदर लेख आहे
ReplyDeleteखूपच सुंदर.......
ReplyDeleteवाह! रविवार सार्थकी लागला.
ReplyDeleteमला हा रूपक गद्य प्रकार खूप आवडला.
ज्या प्रकारे तू संध्याकाळचं वर्णन केलं आहेस ते तर एकदम मस्त.. तुझं लेखन वाचताना एकदम वेगळ्याच विश्वात जातो. छान आणि प्रसन्न वाटतं. 😊
Amazing write up....
ReplyDeleteपहिल्यांदाच समजलं की संध्याकाळ अशी असते ती...nice writing teju
ReplyDelete