अनिश्चित भिंती : शहर, सावली आणि आतल्या माणसाचा शोध | मराठी ललित लेख

 

अनिश्चित भिंती : शहर आणि सावली

— 'कथा संपल्यानंतरही मनात राहिलेलं मुराकामीचं शहर...!'


काही भिंती दिसतात, काही जाणवत राहतात.
शहरात उभं राहताना माणूस ज्या सावलीला ओलांडतो,
ती सावली कधी बाहेरची असते,
तर कधी स्वतःच्या आत खोलवर रुजलेली.


               हे पुस्तक मी “वाचायला” घेतलं नव्हतं. ते माझ्या हातात आलं... आणि हळूहळू माझ्या आत शिरलं. काही कादंबऱ्या आपल्याला गोष्ट सांगतात. काही आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

               The City and Its Uncertain Walls मात्र आपल्याला थांबवते. ती सांगत नाही, समजावत नाही — ती फक्त शांतपणे आपल्या शेजारी बसते.

             ही कादंबरी वाचताना मला सतत असं वाटत राहिलं की मी एखादं कथानक वाचत नाहीये; मी एका मानसिक अवकाशात फिरते आहे. असा अवकाश जिथे वेळेचा वेग वेगळा आहे, भावना मंदावलेल्या आहेत, आणि प्रत्येक गोष्ट जरा धूसर आहे — पण तरीही अस्वस्थ करणारी.

             मुराकामी या कादंबरीत एक शहर उभं करतो. भिंतींनी वेढलेलं, शांत, सुरक्षित वाटणारं. पण या भिंती दगडाच्या नाहीत. त्या मर्यादांच्या आहेत. त्या आपल्याला अडवत नाहीत, पण आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतात. जणू काही आपणच ठरवलेलं असतं — इथेच थांबायचं.

           “To enter the city, you must leave your shadow behind.” या शहरात प्रवेश करताना सावली बाहेर ठेवावी लागते.  ही अट मला फार अस्वस्थ करते. कारण सावली म्हणजे फक्त अंधार नाही— ती आपली संपूर्णता आहे.

आपण ज्या क्षणी म्हणतो... “हे नको,”
“आता एवढं खोल जायचं नाही,”
“इतकं संवेदनशील होणं परवडणार नाही,”
त्या क्षणी आपणही आपली सावली दाराबाहेर ठेवतो.

            मुराकामी इथे एक मूलभूत तात्विक प्रश्न विचारतो... वेदनांपासून मुक्ती मिळवताना, आपण माणूसपणाचं किती मोल देतो? सावलीशिवाय जगणं म्हणजे हलकं होणं नाही; ते कधी कधी रिकामं होणं असतं.

              सावली म्हणजे आपली अपूर्णता, आपली भीती, आपल्या आत दडलेली हळवी बाजू. ती बाजू जी आपण सतत लपवत असतो — जगायला सोपं व्हावं म्हणून.

                 सावली सोडून आत गेल्यावर शांतता मिळते. पण ही शांतता जिवंत वाटत नाही. ती थोडीशी गोठलेली आहे. जणू काही वेदना नाहीत, पण त्याचबरोबर आनंदालाही प्रवेश नाही. मुराकामी इथे कुठेही ठाम विधान करत नाही; तो फक्त एक प्रश्न सोडून जातो —

वेदनांशिवाय जगणं म्हणजे खरंच जगणं असतं का?

            या शहरात माणसं आहेत, पण ती फारशी जाणवत नाहीत. भावना बोथट झालेल्या आहेत. प्रतिक्रिया कमी झालेल्या आहेत. सुरक्षितता आहे, पण स्पंदन नाही. आणि हेच या कादंबरीचं सर्वात अस्वस्थ करणारे सत्य आहे — सुरक्षितता नेहमीच शांती देत नाही.

            “Love existed, but it did not need words.” हे प्रेम मला फार ओळखीचं वाटलं.

            कारण आपल्या आयुष्यातही काही नाती असतात—जी पूर्ण होत नाहीत, पण संपतही नाहीत. ती गोंगाट करत नाहीत, मागणी करत नाहीत, पण आत कुठेतरी शांतपणे राहतात.

            मुराकामी प्रेमाला घटना बनवत नाही. तो त्याला स्थिती बनवतो. आणि म्हणूनच वाचक त्या जागेत स्वतःचं प्रेम सहज ठेवू शकतो.

                या पुस्तकातील ग्रंथालयाचे प्रसंग मला विशेष भावले. “The library held memories....” इथे पुस्तकं नाहीत; इथे आठवणी आहेत. जपलेल्या, वर्गीकृत केलेल्या, सुरक्षित. पण त्या आठवणी जिवंत नाहीत. त्या अनुभव बनून वाहत नाहीत; त्या फक्त अस्तित्वात आहेत. आणि मग जाणवतं — आठवणी जपणं आणि त्यात अडकणं यात फार सूक्ष्म फरक असतो.

                या कादंबरीचा वेग मुद्दाम संथ आहे. तो काही वाचकांना कंटाळवाणा वाटू शकतो. पण मला तो आवश्यक वाटतो. कारण ही कादंबरी मनाबद्दल आहे. आणि मन जेव्हा धावत असत तेव्हा अधूनमधून.... ते थांबतं, मागे वळतं, पुन्हा स्वतःकडेच पाहतं.

               इथे कोणताही ठोस शेवट नाही. कुठलीही निर्णायक दिशा नाही. कादंबरी पूर्णत्वाचा भास देत नाही. पण कदाचित तेच तिचं खरं सामर्थ्य आहे. कारण आयुष्यालाही ठोस शेवट नसतो; ते फक्त पुढे वाहत राहतं — कधी शांत, कधी अस्वस्थ.

                The City and Its Uncertain Walls मला आवडली असं मी सहज म्हणू शकत नाही. पण ती माझ्याजवळ राहिली. वाचन संपल्यानंतरही. काही विचारांत, काही शांत क्षणांत, काही अनामिक अस्वस्थतेत.

ती मला काही करायला सांगत नाही.
ती मला कुठे जायला सांगत नाही.
ती फक्त थोडा वेळ स्थिर उभं करते.

आणि त्या स्थिरतेत,
कदाचित पहिल्यांदाच,
आपल्याला आपली सावली
न घाबरता पाहता येते.


******
लेखिका व तिच्या लेखनप्रवासाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी → About Me | माझ्याविषयी

https://tejashrishinde.blogspot.com/p/about-me.html

- तेजश्री शिंदे ✍️ 



Comments

  1. Wow... अतिशय सुंदर लिखाण...!पुस्तकाविषयी वाचून कधी एकदा The City and Its Uncertain Walls ही कादंबरी वाचतोय असे झाले आहे.

    ReplyDelete
  2. Khup chan tumhi ek negative story madhun positivity grow karta always thanks to you 🙂❣️

    ReplyDelete
  3. A beautifully contemplative response to The City and Its Uncertain Walls.
    Less a review, more an inward journey.

    ReplyDelete
  4. रटाळ समीक्षा न करता, कादंबरीच्या भावविश्वात नेणारा हा लेख मनात शांत अस्वस्थता सोडून जातो. सुंदर लिखाण तेजश्री. नक्कीच वाचतो ही कादंबरी.

    ReplyDelete
  5. Thoughtful and quietly powerful write up !

    ReplyDelete
  6. The city and its uncertain walls... 👍 It was difficult to read some of the high rated Marathi words...but feelings pahunch gaya. Nice write up. Appreciate.
    👏🏼👏🏼👏🏼

    ReplyDelete
  7. This is so so good 👍 👏

    ReplyDelete
  8. तुझ्या या ब्लॉग मुळे हारुकी मुराकामी या जपानी लेखकाच्या पुस्तकबद्दल समजलं.

    तू खुप छान आणि थोडक्यात विश्लेषण केलं आहे.

    एकंदरीत मुराकामी प्रगल्भ आणि खोल तत्त्वज्ञान मांडतात. शांत, संथ गतीने वाचकाला आतल्या जगात घेऊन जाणाऱ्या या कथा आहेत, अस दिसतं. मला नक्कीच वाचायला आवडेल.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सुहास!

      Delete
  9. प्रगल्भ लिखाण....आणि त्यामुळे Murakami वाचावाच लागेल आता.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.