सावली — कोरड्या जगातला एक श्वास !

 



सावली 


मी चालतच आहे...

या वाटेवर जिथे माणसं स्वतःच्या सावल्या हरवून बसली आहेत.

सावली नसलेलं माणूसपण..

किती उघडं, किती असुरक्षित, 

आणि किती निर्जीव वाटतं ना?


इथे प्रत्येक चेहऱ्याला एक पोकळी आहे.

जखमेपेक्षा खोल,

आणि समुद्रापेक्षा हळव्या अशा शांततेची पोकळी.


मी त्यांच्या शेजारून जाते...

स्पर्श केला तरी जीव निघून जाईल असा

निर्जल शांततेचा भस्मासूर त्यांच्या देहाला लागलेला.

ते चालत आहेत...

पण चालण्यात जीव नाही, आशा नाही, दिशा नाही.


क्षणभर मला भीती वाटते..

या नीरवतेने माझे शब्द चोरले तर?

या धुळीने माझ्या मनाचा उमाळा वाळवला तर?


आणि मग,

जणू आकाशाने एखादी गुपचूप खिडकी उघडावी तसा

एक सौम्य प्रकाश माझ्या डोळ्यांत उतरतो.


मी थांबते.

एक झाड.

सगळ्या कोरड्या गर्दीत एक भरलेलं झाड.

फुलांनी भारलेली फांदी,

पानांना जीवाची धडधड,

आणि मुळांमध्ये अनामिक ओल.


मी त्याच्या खोडाला टेकते..

किती शांत, किती उबदार, किती जीवंत!

त्याने शब्द न बोलता माझ्यातील पोकळीत

हळुवार श्वास भरला.


मग लक्षात येतं..

ही सावली साधी सावली नाही,

हा गारवा साधा गारवा नाही,

आणि हे झाडही एक झाड नाही.


ही माझ्या आत्म्याला मिळालेली विश्रांती आहे.

ही माझ्यात अजूनही जगत असलेली आशा आहे.

आणि त्या आशेचं मी एक नाव ठेवलंय — "तू".


-तेजश्री शिंदे ✍️ 

Comments

  1. So deep...so thoughtful!

    ReplyDelete
    Replies
    1. एकच नंबर मॅडम 👌

      Delete
  2. खूपच सुंदर .....

    ReplyDelete
  3. अरे हे भन्नाट आहे... सकाळी सकाळी असे काहीतरी अनाकलनीय वाचायला मिळणे म्हणजे उच्चतम बौद्धिक खुराकच! कसे सुचते एवढे अचाट....प्रगल्भ... मस्त लिहिले आहेस.

    ReplyDelete
  4. Nice Sister👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.