इंद्रधनुष्य.. (कविता)
इंद्रधनुष्य..
उगाचच फिरून फिरून,
मी तुला शोधत राहते,
पाहिलेले अनुभवलेले,
पुन्हा पुन्हा जगू पाहते…!
तू मात्र निसटून जातोस,
मुठीतल्या वाळूसारखा,
अन अचानक समोर येतोस,
इंद्रधनुच्या रंगांसारखा…!
आठवण तुझी इतकी की,
मनही तिच्या छायेत भिजते,
तू नसतानाही तुझ्या असण्याने,
मी जिवंत दिसते…!
कधी शब्दांत सामावतोस,
तू कुजबूजलेल्या वाऱ्यासारखा,
कधी डोळ्यांत विरघळतोस,
मंद पावसाच्या थेंबासारखा…!
आता सवयीनेच बोलते तुझ्याशी मनभर,
तू येशील का नाही — हा प्रश्नही झाला निरुत्तर...!

खूप छान मस्त
ReplyDeleteA deep thoughts of love, freedom and journey of the life.
ReplyDeleteप्रेमाच्या खोल गाभाऱ्यातील भावना तू किती सुंदरपणे व्यक्त केली आहेस. कवितेच्या प्रत्येक ओळीतून मनाची व्यथा, प्रेमाची ओढ आणि भावनांची खोली यांचा आविष्कार दिसून येतो.
ReplyDeleteतुझ्या कवितेची भाषा आणि शैली अत्यंत प्रभावी म्हणजेच माझ्या भाषेत एकदम " कडक " केली आहेस 😃.
"उगाचच फिरून फिरून, मी तुला शोधत राहते" ही ओळ वाचताना तुझ्या मनाची घालमेल जाणवते. "तू मात्र निसटून जातोस, मुठीतल्या वाळूसारखा" ही ओळ वाचताना प्रेमाच्या असहाय्यतेची भावना मनाला भिडते.
तुझ्या कवितेतून प्रेमाची सखोलता आणि भावनांची तीव्रता दिसून येते. तुझ्या कवितेचे कौतुक करावे तितके कमी आहे.
प्रेम आणि आठवण याची शब्दरुपी केलेली अमूल्य साठवण .........
ReplyDeleteतेजश्री शिंदे यांच्या कवितेत भावनांचा प्रवाह इतका सहज आणि नैसर्गिक आहे की वाचक शब्दांच्या ओघात हरवून जातो.
ReplyDelete‘उगाचच फिरून फिरून…’ या कवितेत मनाच्या ओढीचा, आठवणींच्या स्पंदनाचा आणि विरहातील कोमलतेचा अत्यंत सुंदर आविष्कार दिसतो.
प्रत्येक ओळीत एक शांत वेदना आहे, पण ती वेदना सुद्धा सुंदर भासते — हाच या कवितेचा आत्मा.
तेजश्रींच्या लेखणीतून उमटलेला हा भावविश्वाचा प्रवास खरोखरच हृदयस्पर्शी आहे.