मामाचं गाव... म्हणजे आठवणींचं गोजिरं दालन!
मामाचं गाव
आठवणींचं गोजिरं दालन!
एप्रिल महिना जवळ आला की… मुलांच्या परीक्षा, त्यांचा अभ्यास, निकालाची धावपळ—सगळं डोक्यात घर करून राहतं. पण एखाद्या शांत सायंकाळी, चहाचा कप हातात घेऊन निवांत बसले की, नकळत मन भूतकाळात डोकावून जातं. मामाचं गाव… शाळेची सुट्टी… आणि मग मी पुन्हा लहान होते. बालपणाची ती स्वप्नं मनात हळूवार तरळू लागतात.
तो प्रवासच खास होता… गाडीत बसताच मनात एकच उत्सुकता असायची—कधी एकदा मामाच्या गावाला पोहोचतोय! खिडकीतून डोकावलं की दूरवर पसरलेली हिरवीगार शेतं दिसायची, मधूनच लांबच्या आभाळात तरंगणारे ढग, त्यांच्याशी स्पर्धा करणारी उंच झाडं, आणि मधूनच एखादा डोंगर ओलांडताना कानांत गोड बधीरपणा यायचा. आईने बांधून आणलेला डबा उघडताना त्यातली शेंगदाण्याची चटणी-चपाती, गूळपोळीचा गोडवा, आणि मधूनच गाडीत येणारा काळी मैना, करवंद, पेरू विकणाऱ्यांची हाक… या सगळ्यात तास कधी उलटून जायचे कळायचंही नाही.
मामाचं घर म्हणजे गोकुळच! मोठं पटांगण, आजूबाजूला फुललेली झाडं, घराच्या एका बाजूला लावलेल्या फळभाज्या आणि दरवाज्याच्या कोपऱ्यात आईच्या आठवणींचे तुळशीवृंदावन. दुपारच्या वेळी आजोबा अंगणात बसून गोष्टी सांगायचे. राम-सीतेच्या जंगलवासापासून, राक्षसांच्या लढाया, आणि परीकथांपर्यंत सगळ्या गोष्टी मनात साठवून घ्यायच्या. आजोबांच्या गमतीशीर कहाण्या ऐकत झाडाखाली झोपाळ्यावर झुलायचं आणि मधूनच डोळे मिटून त्या गोष्टींच्या दुनियेत हरवून जायचं.
सकाळी उठल्यावर पोहायला जाण्याची उत्सुकता! विहिरीतल्या थंड पाण्यात उड्या मारायच्या, एकमेकांना पाण्याच्या फवाऱ्यांनी भिजवायचं, आणि हातपाय निळे पडले तरी बाहेर यायला जीव नसायचा. मामा ओरडून ओरडून दमायचा, तरीही शेवटची डुबकी मारल्याशिवाय बाहेर यायचंच नाही.
दुपारी उन्हं तापली की आम्ही सगळे पाटपाण्याच्या काठावर जायचो. चिखलात खेळायचो, छोटेसे किल्ले बांधायचो, गवतात लपून एकमेकांना घाबरवायचो. एखाद्या वेळेस रानातल्या आंब्याच्या झाडावर चढून चोरून आंबे पाडायचो. झाडावर चढायला जीव मुठीत धरावा लागायचा, पण तो गोड आंबा तोंडात पडला की सगळा थकवा विसरून जायचो.
संध्याकाळची मजा वेगळीच असायची. वाऱ्याच्या झुळुकीत आजीच्या हातची ताजी दुधावरची साय खाणं, आणि मग आकाशात मावळत्या सूर्याचा खेळ बघणं. रात्री अंगणात चटई टाकून झोपायचं, चुलीवरची वांग्याची भाजी, खमंग भाकरी आणि शेवटी भावंडांसोबत मजा मस्ती करत आजीच्या गोष्टींच्या दुनियेत हरवून झोपायचं.
गावातली प्राणीमित्र मंडळीही खास होती. मामाच्या घरातली गाय तिच्या वासराला चाटत असताना मन प्रसन्न व्हायचं. कुत्रा रॉकी सतत मागे मागे फिरायचा, हातातील चेंडू लांब भिरकावला की तो पळत जाऊन तोंडात पकडून आणून द्यायचा. कोंबड्यांचा थवा तर अंगणभर धावत सुटायचा. पहाटे कोंबड्याची कुकडू-कू कानावर पडली की, झोप उडून जायची....आणि पुन्हा नव्या दिवसाच्या नव्या गमतीजमती सुरू व्हायच्या.
खरं सांगायचं तर मामाचं गाव हे फक्त सुट्टीचं ठिकाण नव्हतं, ते होतं माझ्या लहानपणीच्या साऱ्या स्वप्नांचं, गमतीजमतींचं आणि बिनधास्त हसण्याखिदळण्याचं गोकुळ!
या सगळ्या आठवणींनीच मला "चांदण्यांचे गाव" हे बडबड गीत लिहायला प्रवृत्त केलं. आजही उन्हाळा सुरू झाला की, मन मामाच्या गावाच्या वाटा शोधतं, जिथे आठवणींचे चांदणे आजही लखलखतंय! 🌙✨🏡
**************
"चांदण्यांचे गाव"
चांदोमामा नभात घेतो गिरकी,
ताऱ्यांच्या गावात करतो मस्ती,
ढगांची झूल पांघरून जातो झोपी,
सप्तरंगी स्वप्नांची तो गातो गाणी!
मग येतो ससा अवकाशातून,
चंद्रावरती खेळतो अंगणातून,
परिकथा सांगत जाते परी,
तारकांची रांगोळी घेऊन येते घरी!
ढगांवर झुलतो इंद्रधनू झोका,
वाऱ्याचा चुकतो अवचित ठोका,
मंगळावर बांधू घरटे नवे
चंद्रावरून पाहू चमचमते दिवे!
पंख फुटले पायांना आता,
कल्पनांचे वारे डोक्यात वाहता,
डोळ्यांत माझ्या चांदण्यांचे गाव,
आकाशी उडू दे मनातले भाव!

Very nice 👍
ReplyDeleteRekindle my memories 🤩😍😄
ReplyDeleteगेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी.. त्या आठवणींची शिदोरी उशाला घेऊन त्या आठवणी परत डोळ्यासमोर तरंगत ठेवून जगणं हे सुद्धा मनाला भारावून टाकणार आहे.
ReplyDeleteमामाचा गाव तिथलं नैसर्गिक सौंदर्य आजीची प्रेमळ थाप मामा मामीचा गमतीचे बोलणे ,मित्र मैत्रिणींशी केलेली धमाल. आजही मला वाटते...परत त्याच लहान पणीच्या जगात जावे व परत एकदा बालपण जगावे...खूप छान लिखाण मॅडम
Thank you sir 😊😊
DeleteThank you sir 😊😊
DeleteNostalagic memories 😊
ReplyDeleteअप्रतिम 🤩
ReplyDelete"मामाचं गाव" हा लेख आणि "चांदण्यांचे गाव" ही कविता वाचताना बालपणीच्या गोड आठवणी पुन्हा जिवंत होतात. लेखाच्या तपशीलांनी गावच्या साध्या, निरागस दुनियेत हरवायला होतं, तर कवितेतील लयबद्ध ओळींमधून मुलांच्या कल्पनारम्य जगाची सफर घडते. दोन्हींच्या शब्दांमधून एक निरागस आनंद आणि आठवणींची गोडी डोकावते.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद!
Deleteअप्रतिम शैली!
ReplyDeleteतुझा लेख वाचून खरच मामाच्या गावाची सफर झाली...😍😍😍
ReplyDeleteनातेवाईकांच्या गुंत्यामधये
ReplyDeleteकाही नाती प्रेमाची असावी ,
प्रत्येक पाऊलावरती सोबत
भाच्यांसाठी मामाची असावी !
वाह!
DeleteGaon hey apratim premache sathe astat te aaj tumchya lekhit vachun aathvancha dhar aale aani dole bharun aale khup chan lihaylay 🧿😍
ReplyDeleteThanks Khushi 😊
Deleteखरच बालपणात घेऊन गेलात मॅडम.
ReplyDeleteक्षणभर मी विचाराच्या गर्द कल्लोळात आणि मामाच्या गावच्या जुन्या आठवणीची उजळणी झाली.
लहान पण देगा देवा
मुंगी साखराचा रवा
ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुश्याचा मार......
मनापासून धन्यवाद 🙏
DeleteAwesome... Lahanpan dego deva...
ReplyDeleteमामाचं गाव' हा लेख आणि 'चांदण्यांचे गाव' ही कविता वाचताना बालपणीच्या गोड आठवणी नव्याने उजळून निघतात.
ReplyDelete