अमरचे पत्र (3) "अबोली सावल्या" - अर्थात हळव्या नात्यांची कवडसे!
अमरचे पत्र (3)
अबोली सावल्या
प्रिय सखी,
तुझे पत्र आले आणि मनात साठून राहिलेले सगळे शब्द ओघळून आले. तुझ्या शब्दांना एक अलगच ऊब असते, अगदी हिमाच्छादित कॅनडाच्या संथ हवेमध्येही ती ऊब कायम राहावी, अशी वाटते. तुझं पत्र वाचून —कधीकधी शब्दांनी उशीर करावा, पण संवाद अबाधित राहावा. नात्यांमध्ये जे बोललं जातं तेवढंच महत्त्वाचं नसतं, जे न बोलताही उमजतं, ते अधिक मौल्यवान असतं असं वाटलं.
तू म्हणालीस, मी मागे वळून पाहिलं पाहिजे. खरंच!पण सखी, मागे पाहण्यासाठीही कधीकधी धाडस लागतं.
काही नाती क्षणभर वाट पाहतात आणि पुढे निघून जातात, काही आठवणींच्या हिंदोळ्यावर अर्धवट उभी राहतात,
तर काही… कधीच पूर्णत्वाला जात नाहीत, फक्त मनाच्या एका कोपऱ्यात जिवंत राहतात सदैव.
कदाचित त्यांची सुंदरता, त्याच अपूर्णत्वात असते. कारण पूर्णत्व आले की प्रश्न सुटतात, पण अधुरेपण जपलं की त्यातली ओढ आयुष्यभर टिकते…!
तू जेव्हा रोमा आणि तिच्या सहकाऱ्याच्या नात्याबद्दल लिहिलंस, तेव्हा वाटलं, आपण सगळेच कधी ना कधी अशा भावनिक गुंतागुंतीतून जात असतो. पण मला वाटतं, नात्यांची संज्ञा फार गोंधळात टाकणारी असते. प्रेम, आकर्षण, आधार, गरज, सवय—यामधली सीमारेषा ओळखणं सोपं नसतं. काही नाती ही "एकमेकांना पूर्ण करण्यासाठी" येतात, तर काही फक्त "न राहवून" जुळतात. मग प्रश्न हा नाही की ते बरोबर की चूक, प्रश्न असा असतो—त्या नात्यात आपण आपला स्वतःचा आरसा पाहतो का?
मला एक गोष्ट कधीच समजली नाही, सखी—प्रेम ही भावना आहे की निवड?
काहीजण पहिल्या नजरेत प्रेमात पडतात. काहींना मैत्रीच्या धाग्याने प्रेम गवसतं. काही वर्षानुवर्षे एका नात्यात असूनही एकटे असतात. मग प्रेम म्हणजे नेमकं काय?
अस्वस्थ करणारी ओढ, समाधान देणारी साथ, की केवळ सवय?
सखी, कधीकधी असं वाटतं की माणसं एका वेळी दोन वेगळ्या आयुष्यांत जगत असतात. एक, जे ते बाहेरच्या जगासमोर मांडतात—व्यवस्थित, नियमबद्ध, समाजमान्य. आणि दुसरं, जे त्यांच्या मनाच्या खोल कप्प्यात असतं—अव्यक्त, धूसर, पण जास्त खरं.
बहुतेक रोमा आणि तिच्या सहकाऱ्याचं नातं हे दुसऱ्या प्रकारातलं आहे.
तू म्हणतेस, "पुरुष नात्यांत स्पष्ट नसतात," पण सखी, स्पष्ट असण्याची परवानगीच जर कोणी दिली नाही, तर?
पुरुषाला समाजाने एक चौकट दिली आहे—"संकटांचा सामना करणारा," "भावनांवर नियंत्रण ठेवणारा," "प्रेमात पहिला पुढे होणारा."
पण सखी, पुरुषही कधी कधी थकतो, त्यालाही संवाद नकोसा वाटतो—फक्त एक न बोलताही समजून घेणारी साथ हवी असते.
आणि जेव्हा ती मिळत नाही, तेव्हा तो मागे फिरतो, स्वतःला लपवतो, मौनात स्वतःला शोधू लागतो.
मीही तसाच नाही का?
कित्येकदा तुला सांगायचं राहून गेलं.., राहून जातं.
पुरुषही नात्यांमध्ये "अस्वस्थ" होतो, फक्त त्याच्या वेदनेला आवाज नसतो.
तू म्हणालीस, आपण नात्यांना नावं देतो—मैत्री, प्रेम, आकर्षण.
पण सखी, सगळ्या नात्यांना नाव देता येतं का?
काही बंध शब्दांच्या पलिकडले असतात, काही गूढ, काही अव्यक्त, आणि काही... फक्त जाणवण्यापुरते.
पण तरीही, प्रत्येक नातं आपल्या अस्तित्वाचा एक भाग बनून जातं.
ते नावाने ओळखलं गेलं किंवा नाही, तरी मनाच्या गाभ्यात खोल रुजतं.
आपलं नातंही तसंच आहे ना?
मोकळं, निर्मळ, कोणत्याही अपेक्षेच्या ओझ्याशिवाय...
नाव देण्याच्या गरजेपलीकडचं, पण पूर्णत्वाच्या आनंदात न्हालेलं.
कारण काही नाती जगायची असतात... कोणत्याही प्रश्नाशिवाय, कोणत्याही शंकेशिवाय, नुसत्या विश्वासावर!
तुझ्या पत्राच्या शेवटी कॅनडाच्या निसर्गाविषयी वाचलं आणि नकळत माझी नजर खिडकीबाहेर गेली. इथली झाडं उंचच उंच आहेत, गार वाऱ्याने हलतात, पण उन्मळून पडत नाहीत. कदाचित, आपलं नातंही असंच आहे—कधी डळमळीत, पण मुळांशी घट्ट जोडलेलं.
इथल्या सरोवरांमध्ये आकाश उतरलेलं दिसतं, पण त्यांचं पाणी अजूनही शांत असतं. तसंच काहीसं आपल्याबाबतही नाही का? संवाद होत राहतो, कधी शब्दांत, कधी शांततेत, पण त्याचा खोलवर अर्थ लावायचा प्रयत्न दोघांनीही कधी केला नाही.
तुझ्याशी असलेल्या संवादाचा अर्थ लागावा असं मला कधी वाटलं देखील नाही, सखी.
हा संवाद तसाच चालू राहावा, निरंतर.
कधी प्रश्नांनी, कधी शांततेने.
कारण काही नाती पूर्णत्वासाठी नसतातच, ती फक्त जपण्यासाठी असतात.
आपल्या मैत्रीच्या, ओढीच्या आणि संवादाच्या या नाजूक धाग्यांना मी असाच जपत राहीन— तुझ्या पत्रांमध्ये, आठवणींच्या ओल्या वाळवंटात, आणि कधीतरी तुझ्या नकळत... तुझ्या सावलीत.
तुझ्या अंतरंगात वसलेला

मस्त आहे, पुरुषांच्या मनातील भावना व्यक्त होत आहेत
ReplyDeleteSpeechless ma'am 😍😍😍😍lovely , how well the confusion, relationship, love, needs are mentioned in a simple yet very effective.............chumeshwari letter😘😘😘😘😘
ReplyDeleteThank you so much Asha ma'am 💓
Deleteपत्र म्हणजे शब्दांपलीकडचं नातं अनुभवण्याची संधी. संवाद, मौन, नात्यांचा गूढ अर्थ—सगळं काही अगदी हळुवारपणे उलगडत जातं. अमर आणि सखीच्या नात्याला ठराविक व्याख्या नाही, पण त्याची जाणीव मात्र खोलवर रुजते.
ReplyDeleteपुरुषाच्या भावना, नात्यांमधील अपूर्णतेचं सौंदर्य, आणि संवादाची अनामिक ओढ—हे सगळं पत्राच्या प्रत्येक वाक्यात जाणवत राहतं. काही नाती पूर्णत्वासाठी नसतात, ती फक्त जपण्यासाठी असतात, हे विचार मनाच्या एका कोपऱ्यात कायमचे घर करतात.
"अबोली सावल्या" हे फक्त एक पत्र नाही, तर नात्यांच्या अबोल छटांचं हळुवार चित्रण आहे.
इतका सुंदर अभिप्राय दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏
DeleteThe depth of emotions, the poetic flow, and the philosophical reflections make this letter truly mesmerizing. It lingers in the heart long after reading. Great letter ma'am 😍😍
ReplyDeleteThank you 😊
Deleteशब्दांपेक्षा जास्त, भावना जपणारं पत्र...
ReplyDeleteAmazing flow of pen 💛💛💛💛💛💛💛💛💛
ReplyDeleteThe depth of this letter is unbelievable✌🤘❤
ReplyDeleteआठवणी, उत्स्फुर्तपणे जाग्या झाल्या अप्रतिम लिखाण खरच कौतुक 🎁
ReplyDeleteAwesome Shabd, mandani, deep thinking... Touching...
ReplyDeleteप्रेमाला पूर्णत्व देणारे पत्र ..........
ReplyDeleteखरंच खूप भावूक आहे हे पत्र... जुन्या आठवणींना उजाळा देणारे पत्र... अप्रतिम वाक्यरचना ...
ReplyDeleteनातं असं ही असू शकत...i am impresed 😛मानल तर सर्व आहे.....👌👌👌
ReplyDeleteया पत्रात पुरुषाची व्यथा अगदी उत्तम मांडली आहेस तू,
ReplyDeleteमला असे वाटते जी नाती आपल्याला आवडतात त्या नात्याला नाव न दिलेले बरे..
प्रेमाचं असो या मैत्रीच असो जी नाती खोलवर जपली जातात त्या नात्याला नाव नसलेले बरे त्याने नाती गमाविण्याची भीती नसते अमर त्याच्या जागी एकदम परफेक्ट आहे. तेजू मला असं वाटतं कि प्रत्येकाच्या आयुष्यात एक जरी सखी /सखा असावा आपलं मन मोकळ करण्यासाठी.
कृष्णाने कधीच राधेला वचन दिलं
नाही. पण तरीही ती आयुष्यभर
त्याची वाट पहात राहिली. तो
गोकुळ सोडून गेला. राजमहालात
रमला, पण राधेच्या मनात मात्र
तोच तसाच्या तसा राहिला.
कधी कधी प्रेम बोलत नाही. ते फक्त
मनात खोलवर. साठून राहतं;
शब्दांविना, अपेक्षांविना, कोणीतरी
आपल्यासाठी आयुष्यभर तसंच उभं
राहतं, न बोलता, न मागता, न तक्रार
करता आणि तेव्हा कळतं, वचणं दिली
जात नाहीत, ती फक्त निभावली
जातात; "राधेसारखी".
जसं म्हणतात ना.."प्रेम कधी ही, कोठेही, आणि कोणावरही ही होऊ शकत.. ते अगदी खरं आहे. बस ते प्रेम निःस्वार्थ असायला पाहिजे ..
कोणतीही अपेक्षा न ठेवता..
कधी कधी मन एवढे जड होते की कोणाकडे तरी जाऊन हलकं करावसं वाटतं तेव्हा आजूबाजूची सर्व नाती पटापट मेंदूत येतात पण मात्र जशी येतात तशीच निघून ही जातात तेवढ्यात मनातल्या एका कोपऱ्याच्या काळ्याभोर अंधारातून एक ओळखीचा आवाज येतो आणि म्हणतो "एवढं काय विचार करतोस/करतेस मी आहे ना? चल एक कटिंग पिऊ या सर्व काही ठीक होईल."मग हळूच चमकते प्रकाशातून ती व्यक्ती जवळ येते तो असतो न सांगता, न बोलता, न विचारता सर्व ओळखणारा एक व्यक्ती म्हणजेच जीवाभावाचा मित्र/ सखा /सखी .❤️🫂
काही नाती नावाशिवाय जपली जातात, आणि त्यातच त्यांची सुंदरता असते. राधा-कृष्णासारखी काही बंधनं शब्दांच्या पलीकडची असतात—न मागता, न तक्रार करता जपली जाणारी.
Deleteअशा नात्यांचा संवादही खास असतो—कधी शब्दांत, कधी शांततेत.
इतक्या भावनिक आणि वैचारिक अभिप्रायाबद्दल धन्यवाद 😊🙏
पहिला परिच्छेद
ReplyDeleteतुझ पत्र वाचून कधी कधी शब्दांनी उशीर करावा पण संवाद अबाधित रहावा - *अफलातून थॉट आहे. हे लिहायला सुचणे हीच अफलातून बात आहे. याचा अर्थ कळायला अनेक वेळा ही वाक्य डोळ्याखालून घालावी लागतील पण ज्याला समजेल तो अचंबित होईल*
नात्यामध्ये जे बोलल जात तेवढच महत्त्वाचं नसतं जे न बोलताही समजत ते अधिक मौल्यवान असत - *या वाक्यातून लेखिकेची नात्यांच्या विचारांची प्रगल्भता आणि खोली लक्षात येते. नात्यातील व्यक्त आणि अव्यक्त बोलण या दोन्हीचे मुल्य आणि महत्व इथे अधोरेखित होते*
क्षणभर वाट पहातात ते ओढ आयुष्यभर टिकते या परिच्छेदात *काय लिहिल आहेस तू ग्रेट. शब्दरचना , वाक्यरचना सुंदर , अप्रतिम , थक्क करायला लावणारी.नाती किती घट्ट विणली जातात , एक हक्काची जागा घेऊन बसतात आणि किती खोलवर मनात रुजलेली असतात हे यातून सांगितले आहे.*
तू जेव्हा रोमा पासून अस्वस्थ करणारी ओढ - *या परिच्छेदात प्रत्येक शब्द विचारात पाडणारा , हेलावून टाकणारे लिखाण ,
*नात्यांची संज्ञा फार गोंधळात टाकणारी असते.*
*काही नाती ही "एकमेकांना पूर्ण करण्यासाठी" येतात, तर काही फक्त "न राहवून" जुळतात*
ही दोन्ही वाक्ये चेरी ऑन दी टॉप सारखी आहेत.
दोन वेगळ्या आयुष्य जगतात हा परिच्छेद *म्हणजे अनेक जणांच्या खऱ्या आयुष्यातील वास्तव आहे*
पुरुष नात्यात स्पष्ट नसतात - पुरुष नात्यांमध्ये अस्वस्थ होतो त्याच्या वेदनेला आवाज नसतो
*हा संपूर्ण परिच्छेद पुरुषांचे दुखणं वेदना अस्वस्थता ठळकपणे अधोरेखित करत पुरुषांना देखील लेखणीतून पूर्ण न्याय देण्याचा विचार स्पष्ट होतो.*
तू म्हणालीस, आपण नात्यांना नावं देतो—मैत्री, प्रेम, आकर्षण.-कोणत्याही प्रश्नाशिवाय, कोणत्याही शंकेशिवाय, नुसत्या विश्वासावर!
*हा परिच्छेद म्हणजे नात्याला नाव दिले तरच ते बळकट होत आणि नाही दिले तरी ते नात कमकुवत होत असे नाहीये हे लेखिका खूप सुंदर , सकारात्मक पद्धतीने अगदी मोजक्या आणि समर्पक शब्दात समजावून सांगते*
तुझ्या पत्राच्या शेवटी कॅनडाच्या निसर्गाविषयी वाचलं - प्रयत्न दोघांनीही कधी केला नाही.
*हा परिच्छेद सखी आणि अमर मधील नात डळमळीत असले तरी घट्ट जोडलेले आणि पूर्णत्वाला गेले नाही तरी जपले पाहिजे हे ठामपणे सांगतो संवाद होईल न होईल संवादाचा अर्थ लागेल किंवा न लागेल पण संवाद चालू रहावा यातून लेखिका संवादाचे महत्व पुरेपूर पटवून देते*
आपल्या मैत्रीच्या, ओढीच्या आणि संवादाच्या या नाजूक धाग्यांना मी असाच जपत राहीन— तुझ्या पत्रांमध्ये, आठवणींच्या ओल्या वाळवंटात, आणि कधीतरी तुझ्या नकळत... तुझ्या सावलीत - *हा परिच्छेद अमरच्या प्रामाणिक आणि हळुवार भावना ठोसपणे आणि प्रखरपणे नमूद करतो*
सौरभ दादा
Deleteतुझी समीक्षा वाचून मनभरून आलं! तू प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना इतक्या बारकाईने उलगडल्यास की माझ्याही लिखाणाकडे मला नव्याने पाहायला शिकवलंस. तुझ्या दृष्टिकोनातून हे पत्र पाहताना जाणवलं की शब्द कधी कधी लेखकाच्या अपेक्षेपेक्षा जास्त खोलवर जातात. तुझ्या प्रतिक्रिया नेहमीच प्रेरणादायी असतात. खूप आभार!😊🙏
👌🏻 खुप छान व्यक्त झाल्या आहेत अबोल भावना...
ReplyDeleteप्रिय तेजू...
ReplyDeleteया पत्रातून पुरुष मनाच्या गूढ आणि अव्यक्त भावनांना शब्द मिळतात. समाजाने पुरुषांसाठी आखलेल्या चौकटी, त्यांची अस्वस्थता, नात्यांमधील त्यांची भूमिका आणि त्यांची मौनात दडलेली वेदना इथे ठळकपणे व्यक्त होते. प्रेम, आकर्षण, सवय आणि अपेक्षांच्या सीमारेषांमध्ये अडकलेले पुरुष मन कधी संवाद शोधतं, तर कधी स्वतःलाच समजून घेण्याचा प्रयत्न करतं. हे पत्र म्हणजे त्यांच्या न बोलल्या जाणाऱ्या कथा, त्यांची गुंतागुंत आणि त्यांची खोलवर असलेली नात्यांची जाण सांगणारा एक हळवा प्रयत्न लेखिका म्हणून तू केला आहेस... याकरिता तुझे अभिनंदन!
तू खरच एक खूप संवेदनशील व्यक्ति आहेस..तुझ्या कविता, पत्र भुरळ घालतात, तुझ्या विचारांचा पल्ला इतका मोठा आहे की वाचक म्हणून आम्हाला किमान 3-4 वेळा वाचन करून समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. माझ्या या गूढ अनाकलनीय मैत्रिणीस पुढील लिखाणासाठी शुभेच्छा! 💐💐💐
मनापासून आभार शीतल!
Delete