लेखणी (कविता)

 

लेखणी


हातात लेखणी आली नसती 

तर ती झाली असती राजकुमाराची राणी 

जो पांढर्‍या घोड्यावर स्वार होऊन 

घेऊन गेला असता तिला त्याच्या राजमहाली..


कि लंकेची पार्वती होऊन 

तिष्ठत बसली असती रामाची वाट पाहत 

जो घेऊन जाईल तिला कधीतरी 

त्या दुष्ट रावणाच्या तावडीतून 


हातात लेखणी आली नसती

तर 'बा' ने लावून दिले असते लगीन 

अन् दोन पोरांची आई होऊन 

मिरवत राहिली असती सौभाग्याचे चारमणी ..


आईने दिलेली बाईपणाची शिकवण 

लग्नानंतर ती बदलत रहाते बाईमन 

पत्नी, सुन, आई, वहिनी अशा नात्यात 

ती हरवून जाते तिच्या जन्माचा खरा अर्थ 


हातात लेखणी आली नसती 

तर पडलेल्या प्रश्नाची पेटली असती होळी

अन् अगणित प्रश्नांचा प्रवास 

कधीच विरून गेला असता पंचमहाभूतात


किमान या लेखणीने तिच्या विचारांना 

करून दिली पायवाट..

जी मैलोनमैल तुडवत ती करते आहे प्रवास 

स्त्री जन्म शोधण्याचा..!


ती ढुंढाळतेय इतिहासातील 

राहून गेलेल्या पाऊलखुणा 

'ती'ला स्वतःच करावे लागेल उत्खनन 

अन् शोधून काढावी लागतील

दबून पडलेली स्त्रीत्वाची चिन्हे


तिला थांबताच येणार नाही इथवर 

कारण तिच्या पाऊलवाटा तुडवत 

अनेकींनी स्विकारला आहे तिचाच मार्ग 

जो यातनांतून फुलवतो स्वत्वाचे कारंजे 


तिला गर्भित स्त्री-रूप आता गवसले आहे.


                                                 - तेजश्री शिंदे 

























Comments


  1. लेखणी कविता खूपच चांगली आहे
    मस्त

    ReplyDelete
  2. Teju खर सांगतो काल जेंव्हा ही कविता तू पाठवली आणि मी वाचली तेंव्हा माझा लगेच रिप्लाय होता की खूप वेळ वाचावी लागेल. त्याच कारण अस आहे कविता वाचत असताना अश्या लेखणी मुळे क्रांती करून अजरामर असलेल्या किती तरी ती( बहिणाबाई, सावित्रीमाई, सिंधुताई,) नजरेसमोर येतात.
    ती ला शिक्षण किती महत्वाचे आहे हे प्रतेक शब्दातून व्यक्त होत आहे. लेखणी नसती तर काय झाले असते आणि लेखणी मुळे काय होत आहे हे सर्व तू वरील ओळीमध्ये मांडण्याचा प्रामाणिक यशस्वी प्रयत्न केला आहेस.
    कवितेत प्रतेक शब्द त्याच्या जागी अगदी अचूकपणे ठेवला आहेस आणि तुझे शब्द सुद्धा त्यांचे जागी त्यांची भूमिका उत्साहाने पार पाडत आहेत. त्यामुळे कविता अत्यंत हृदयस्पर्शी अशी झाली आहे.
    तुझी लेखणी नक्कीच वाचकांना भुरळ घालेल यात शंका नाही.
    तुझा हा प्रवास निरंतन सुरू राहो. तू नवीन वाटा शोधत राहशील आणि सगळ्या ती.. तुझ्या शोधलेल्या पाऊलवाटेने चालत राहतील आणि त्यांनाही गर्भित स्त्रिरूप गवसेल अशी आशा व्यक्त करतो.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद अझहर! स्त्री शिक्षण हा तसा फार गंभीर विषय आहे. आजही मुलींना शिक्षणाच्या बाबतीत दुय्यम स्थान मिळते. मध्यमवर्गीय माणूस एकाच मुलाचे शिक्षण करू शकत असेल तर तो मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य देतो. मुलींच्या लग्नावर जेवढा खर्च केला जातो तेवढा तिच्या शिक्षणावर करण्याची वृत्ती दिसून येत नाही. त्यामुळे समाजाने याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. मुलगी मग ती कोणत्याही स्तरातील असो.. संघर्ष हा तिच्या नशिबी अटळ आहे. अन्यथा जे समोर येते त्याचा निमुटपणे स्विकार करून पुढे जात राहणे यापलीकडे दुसरा पर्याय रहात नाही.

      Delete
  3. खूपच अप्रतिम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.