अमर'चे पत्र (पहिले)

 

           

         

                                         अमर'चे पत्र


प्रिय सखी,


         माझ्यासाठी नेहेमीच कुतूहलाचा विषय असलेली, स्त्री म्हणून समोर असली तरी त्यापलीकडची एक निखळ व्यक्ती म्हणून माझ्यासमोर आलेली, विचारातली परिपक्वता, आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली, सहजता हाच जिचा शृंगार वाटावा आणि प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्याच जाणिवेतून पाहणारी अशी तू, म्हणजे माझी सखी!

                 तुला "माझी" म्हणतानाही अंगावर सरकन काटा उभा राहिला. तू इतकी हवीहवीशी आहेस, पण तरीही पुन्हा तुझ्या समोर येताना पोटात गोळा येतोच. माझ्या वैचारिक भावविश्वाला काही काळासाठी तू व्यापून टाकलेस. काही म्हण पण तुझ्याकडे बघून खूप शिकण्यासारखे वाटले.. त्यात काही क्षण तुझ्यासोबत जगता आले हे म्हणजे माझ्यासारख्याला वाळवंटात पाणी मिळण्यासारखे होते. मी मितभाषी असलो तरी माझ्या करेक्ट भावना तुझ्यापर्यंत पोहोचत होत्या. 

                तुझ्या प्रत्येक पत्राला किमान वीस-पंचवीस वेळा तरी वाचले असेल, तरीही त्यातील अनेक गोष्टी आजही अनाकलनीय वाटतात. तू म्हणतेस त्याप्रमाणे याला मी सर्वार्थाने लहान असल्याचे कारण असू शकेल???? कुणास ठाऊक ? पण नक्की काहीच सांगता येणार नाही. खूप प्रश्नचिन्ह आहेत. 

                     तू हळूहळू माझ्यासमोर खुलत गेलीस. तुझा तो बिनधास्तपणा माझ्या सारख्या लाजर्‍या-बुजर्‍या व्यक्तीला फारच भावणारा होता. दरम्यानचा काळ हा माझ्यासाठी फारच क्रूशल असा होता. अनेक स्थित्यंतरे घडत गेली आणि मी देखील त्यांच्या प्रभावाखाली वाहवत गेलो. ठहराव म्हणतात तो नव्हताच आयुष्यात. समुद्रात भरकटलेल्या नावेसारखे आयुष्य दिशाहीन झाले होते. त्यात तू अशी ओझरती माझ्या आयुष्यात आलीस की तुला सतत शोधू लागलो. आज विचार केला तर तो शोध मला माझाच वाटत जातो. 


                  एखाद्याच्या येण्याने आपण इतके शोधक होतो का ग..?? आज वळून पाहिले तर सगळेच भासमान वाटते पण तुझ्या पत्रांनी पुन्हा जिवंतपणा आल्याची जाणीव होते आहे. आता हा जिवंतपणा नक्की नात्यात आला आहे की आयुष्य जगण्यात एवढे मात्र माझ्या समजण्या पलीकडचे आहे.


             तू म्हणजे सुगंध आहेस, कोणत्याही नात्याला उर्जितावस्था देणारी! तुझा "बंधमुक्त" हा शब्द मला फारच आवडतो. मला तसे जगावे वाटते म्हणून नव्हे, तर एक स्त्री असून देखील तू तसे जाणीवपुर्वक जगत आहेस म्हणून..! स्त्रीत्वाचा कोणताही आततायीपणा तुझ्या वागण्यात नाही. तुझ्या व्यक्तिमत्त्वातच माणुसकीचा अविरत झरा आहे. मी अनेक पुस्तक वाचली, समजून घेतली.. आचरणात आणली पण माणसे वाचणारी, समजून घेणारी आणि त्यांच्या सोबत प्रगल्भ होणारी तू पहिलीच..!

                  तुला कॉफी आवडते हे फार उशीरा कळले. तू कधी तसे जाणवूच दिले नाहीस. तुझ्या सोबत घेतलेला चहाचा प्रत्येक कप हा खास होता...कारण तू जेवढे त्या कपाअडून पहात होतीस, त्यापेक्षा कितीतरी जास्त मी तुझी नजर चुकवून तुला न्याहाळत होतो.

                 मला तुझ्यासारखे कधीच व्यक्त होता येणार नाही, पण तुझ्या पत्रांना डावलून उत्तर न पाठवणेही मला शक्य नव्हते. आज शनिवार.. तुझा आवडता दिवस! मीही आज ऑफिसला दांडी मारली. मग काय.. बसलोय लिहीत. 

                 तुझ्यासोबत काही क्षण जगलो, रित्या हाती आलेलो आज ओंजळ भरून आहे. तुझ्या आठवणींचा कप्पा मी ही जपून ठेवला आहे. 

              ऑफिसातील गुलाबाची कुंडी सोबत आणली होती. त्याला आता दोन पांढरेशुभ्र गुलाब फुलले आहेत. इथेही तो एकटा नाही. प्रवाही होतो आहे..प्रयत्नात आहे.


                                                                                                           तुझी सहजता भावलेला 
                                                                                                                         अमर 
 


               


              

Comments

  1. अमरच्या मनात तुम्ही एक सर्व गुण संपन्न आणि त्याच्या आयुष्यात आलेला एक अनमोल व्यक्ती आहे. ज्याची तो तुलना कोणाशी करू शकत नाही. तुम्ही त्याच्या साठी सर्व बाजूंनी सकारात्मक विचार बाळगून आयुष्यात पुढे कस जायचं याचे मार्गदर्शन तुमच्या कडून होते. साधा आणि सोपा भाषेत म्हणाल तर *All in One* आहात तुम्ही 🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. दोन व्यक्तींमध्ये देवाण घेवाण होतेच... ती भावनिक, मानसिक, वैचारिक अशा वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते...अमर आणि सखी अशाच दोन व्यक्ती आहेत.

      Delete
  2. खूप छान लेखन केलेय. काही आयुष्यातील आठवणीं पुन्हा एकदा जाग्या झाल्या...

    ReplyDelete
    Replies
    1. यानिमित्ताने तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला हे मी माझे भाग्य समजते. 😊

      Delete
  3. प्रिय सखी
    आज आपका पत्र पढते-पढ़ते मेरी आंखों से आंसू छलक गए और मुझे पिछले 15 दिन की याद आ गई जो हमने साथ बिताए...और लगा के दुनिया में अच्छे लोग है इसलिए दुनिया चल रही है,,और इसका सबसे बड़ा उदाहरण आप है....

    ReplyDelete
    Replies
    1. कोशिश कर रही हुँ... जिंदगी को नए अंदाज मैं जीने की। आपके इन प्यारे अल्फाजों के लिए बहोत शुक्रिया... शाहीन...!!

      Delete
  4. अतिशय सुंदर.. छोट्या छोट्या गोष्टी कीती समर्पक रित्या व्यक्त केल्या आहेत. अस वाटतंय अमरच्या शेजारी बसून पत्र लिहितानाचे मी त्याचे हावभाव त्याच्या भावना पाहु शकते इतका जिवंतपणा आहे या लेखनात 😊

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Swara...! मलाही पहिल्यांदाच अमर च्या भूमिकेत जाऊन लिहिता आले याचा आनंद आहे.

      Delete
  5. खूप छान मॅडम... वाचता वाचता मी प्रत्येक ओळीमध्ये हरवून गेले. असे वाटत होते की खरंच अमर आपल्या समोर आहे आणि पत्र वाचत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Riya... अमर सगळ्यांनाच खूप आवडला आहे.

      Delete
  6. Teju, अमर च्या भावना तू जितक्या सुंदर पद्धतीने मांडल्या आहेस ना मला नाही वाटत अमर ला त्या अश्या मांडता आल्या असत्या. तुझ्या प्रत्येक लिखाणाचं मी भरभरून कौतुक केले आहे. आणि नेहमी एक वाक्य म्हणत आलोय. तू मांडलेल्या भावना, घटना हे कुठेतरी कधीतरी माझ्या आयुष्यात घडले आहे किंवा विचारत येवून गेले आहे असे भासते. कदाचित प्रतेक वाचकाला वाटत असेल तसे. अमर च्या भावना व्यक्त करताना सुद्धा तू सर्व मुद्दे कव्हर केले आहेस. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समृद्ध नाते, त्याचा मितभाषीपना, तुझा समजूतदार पना, चहा चे रोमँटिक क्षण जे तुम्ही जगलात, असे बरेचसे मुद्दे तू मांडले. बंधमुक्त होवून भावनिक होवून तू वास्तव मांडतेस पण ते मांडताना तेवढीच शब्दांची सभ्यता ही जपतेस ही तुझी खुबी..

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग वर तुझे नाव न आल्याने नक्की कोणी अभिप्राय दिला हे नाही कळले.. पण वाचल्यावर अझहरच आहे याची खात्री पटली. Thanks अझहर.. अमर सगळ्यांना इतका आवडेल याची कल्पना नव्हती... किंबहुना सखी पेक्षाही वाचकांना तो आवडू लागला आहे... पत्रांची ही देवाण घेवाण अशीच सुरू राहील..आणि त्यातून ते अजून खुलत जातील.

      Delete
  7. अमरने पत्राला उत्तर दिले हाच सुखद धक्का आहे. असं वाटलं होतं की सखीच व्यक्त होत जाईल. चला या निमित्ताने अमरच्या भावना, त्याचं व्यक्तिमत्व कळत जाईल..

    या पत्रामुळे जिवंतपणा आला आहे, असं अमर म्हणतोय. बघू हा जिवंतपणा न्यायला पुन्हा जगवतो का?

    अमर एवढा संवेदनशील आहे, त्याला सखी सर्वार्थाने परिपूर्ण वाटते, मग तो दूर का गेला??

    अमर देखील सखी एवढा सर्जनशील, प्रतिभावान आहे. दोघे एकमेकांना साजेसे आहेत. बघू सखी काय उत्तर देते ☺️

    ReplyDelete
  8. अगदी खरे आहे.... दोघेही एकमेकांना समर्पक एकमेकात मिसळून सुद्धा आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहेत. हाच त्यांच्या नात्याचा गोडवा आहे. वाचकांना ते दोघेही भावतात.. आपलेसे वाटतात ही त्या पात्रांची ताकत आहे.

    ReplyDelete
  9. खूप छान....या पत्ररुपी लेखा मधून पुरुष मनाची हळवी, प्रेमळ बाजू मांडलीत... धन्यवाद

    ReplyDelete
  10. वाह! फारच सुंदर त्याच्या भावना

    ReplyDelete
  11. एकदम मस्त लिहिले काही जुंन्या आठवणीं पुन्हा एकदा जाग्या झाल्या ....पोलिस दलातील कर्तव्यदक्ष. जबाबदार व्यक्तिमत्त्.. खाकी वर्दीतील महाराष्ट्र पोलीस शिंदे मॅडम. यांनी वेळात वेळ काढून लिहलेले लेख खूप छान असतात.. ... 24 तास देश सेवा करीत मुलांची शाळा कॉलेज घरातील काम संसार सांभाळत तुम्ही तुमचा छंद . तुमच्या वेगवेगळ्या लिखाणातून नेहेमीच काही ना काही शिकण्यास मिळत असले वेळात वेळ काढून... घरातील काम आणि पोलिस दलातील कर्तव्य. जबाबदारी सांभाळून ..कुठून आणता ओ एवढी ताकत जोश.. स्त्री म्हणल की त्यांना कधीच आराम न करणारी व्यक्ती स्वत ला कधी च वेळ न देता किती ही त्रास झाला तरी ही खंबीर पने उभी ना कधी डगमगणारी यातून वेळात वेळ काढून सतत काही ना काही करण्याची धडपड तेही स्वतःच्या हिमती वरती... सलाम माझा कार्याला तुम्हास शब्द अपुरे पडत आहेत तुमचे खूप खूप लेखन असतात्. .

    ReplyDelete
    Replies
    1. इतक्या सुंदर अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद विकास...! आपले शब्द माझ्यासाठी उत्साहवर्धक आहेत.

      Delete
  12. "प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे same असते"

    उत्कृष्ट शब्दशृंगार madam.....

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरे आहे... आणि ते कोणत्याही वयात झाले तरी शब्द भावना अगदी सारख्या असतात...! तुलाही शाळेतली सखी आठवली. 😄

      Delete
  13. पहिलं तर तुम्ही पत्र खूप सुंदर लिहिले आहे.अमरचे भाव खूप गोड आणि निरागस आहे. माझ्या बद्दल सांगायचे झालं तर मी प्रेम करण्या इतपत मोठी झालेली नाही...😇 पण एक गोष्ट नक्की सांगेल की...
    जगावे असे की
    मरणे अवघड होईल,
    हसावे असे की
    रडणे अवघड होईल,
    कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
    पण प्रेम टिकवावे असे की
    तोडणे अवघड होईल....

    अशीच पत्र आमच्या भेटी येऊ द्या... 🌹

    ReplyDelete
  14. खरच ,अप्रतिम पत्र आहे,

    ReplyDelete
  15. या कवितेतील भावना पहिल्या प्रेमाच्या आहेत. जसा वसंत ऋतू बहरतो झाडांना नवीन पालवी फुटते तशीच पहिल्या प्रेमात भावनांना अशी सुंदर निर्मळ भावनेची पालवी फुटते. प्रत्येकाच्या आयुष्यात असा बहर येतो आणि जातो, काहींच्या आयुष्यात तसाच राहतो. पहिल्या पावसात भिजल्यासारखा अनुभव या कवितेतून आला.

    ReplyDelete
    Replies
    1. तुला तुझ्या पहिल्या प्रेमाची आठवण झाली...हे या पत्राचे सौंदर्य आहे. अमर मध्ये सगळ्यांनाच त्यांच्या भावना दिसल्या...अनुभवल्या गेल्या...हे खूप भारी आहे. Thank you Akshay 😊

      Delete
  16. प्रेम हे असच असत.. थोड सोप अन थोडस अवघड असत..पण एकदा जमल की आपोआपच होत जात...

    ReplyDelete
    Replies
    1. प्रेम हे नदीसारखं खळखळणारे अन् समुद्रासारखं अथांग असत..

      Delete
  17. जय हिंद. तुमची देश आणि वेळात वेळ काढून लिहलेले... ह्या लेखनातून रोज काहीं जुन्या आठवणी ताज्या होतात व. ह्यातून नविन काय तरी शिकण्यास मिळत असते.......thank you खूप छान. ..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.