कोरा चेहरा.. जो काळाच्या ओघात होत जातो शून्य!

 

कोरा चेहरा


तो कोर्‍या चेहर्‍याने पहात राहिला एकटक 

विचारशून्य, भावनाशून्य अस्तित्व विरहित नजरेने 

जणू काही घडतच नाही वर्तमानात नि 

भूतकाळ तर केव्हाच संपुष्टात आलेला

 मग आठवणी उरल्याच कुठे उफाळून वर यायला..!


मी कितीही आवाज दिले तरी 

तो ऐकूच शकत नाही शब्द..

कारण त्याचे कान वितळून गेले आहेत 

संवेदनांच्या तप्त आगीत..

दृष्टिहीन, स्पर्शहिन कोलमडून पडलेले सर्वस्व 

त्याला आता काहीच उभे करता येत नाही.


त्याचे असे बुजगावणे होत जाणे मला सहन होत नाही.

त्याचा नाकर्तेपणा अनाकलनीय वाटत रहातो 

मी सर्वतोपरी करते प्रयत्न तो म्हणुन समजून घेण्याचा..

पण त्याच्या निर्बुद्ध चेहर्‍यावर दिसून येत नाहीत 

कोणत्याच खाणाखुणा माणूस म्हणून असण्याच्या 


मी हतबल..निराश...जड पावलांनी निघून जाते 

कारण त्याचे अस्तित्वच मी नाकारत चालले आहे.

मी शोधू पहात आहे,

माणसाचे बुजगावणे होत जाण्याचा प्रवास..

जो कितीही अनाकलनीय वाटला 

तरी सापडतील त्याच्याही वाटा..

ज्या पुन्हा माणूस म्हणून उभा राहत 

शिकवत जातील माणुसकीचा धडा ..


शिकवत जातील माणुसकीचा धडा..!!


                                                   - तेजश्री 

- आपल्या आजूबाजूला असा 'कोरा चेहरा' घेऊन अनेक व्यक्ती वावरताना दिसतात. एक संवेदनशील व्यक्ती म्हणून अशा लोकांविषयी आपल्याला अनेक प्रश्न पडतात...आपण कळत-नकळत अशा लोकांविषयी, त्यांच्या मानसिकतेविषयी विचार करत रहातो. यातून आपण आपल्या भावनिक - वैचारिक पातळीवर विकसित होत नेहमीच positive गोष्टींचा शोध घेत रहातो.




Comments

  1. संवाद साधणे, व्यक्त होणे, स्वतःचा शोध घेणे या माणूस बनण्याच्या प्रक्रिया आहेत. अश्या या स्व प्रतिमेत हरवलेल्या जगात आपण लिहित आहात, व्यक्त होत आहात, हे आशादायी चित्र आहे. कविता हे व्यक्त होण्याच एक उत्तम माध्यम आहे. कवि नामदेव ढसाळ हे असे म्हणायचे की दुःखा नंतरच्या वेदनेची जागा मी कवितेला दिली.असेच लिहीत रहा आमच्यासाठी.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद अक्षय...तुमचे शब्द माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. अशाच प्रतिक्रिया कळवत रहा.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.