सखी'चे पत्र (3).. हरवलेल्या 'मी' च्या शोधात!



                            पत्र तिसरे 


प्रिय अमर,


             काही माणसं आपल्या आयुष्यात आली की, आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी फार बदलल्या सारख्या वाटतात...तुला हे.. असे..वाटले का रे कधी..??.. म्हणजे बघ हं...घडणार्‍या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी या काही त्या व्यक्ती मुळे घडत नाहीत....पण त्याच्या सोबत असल्यामुळे आपण मात्र खूप उर्जित होतो...आणि ही ऊर्जाच आपल्या बदलाला कारणीभूत ठरते...ती माणसे फक्त निमित्तमात्र..!


              तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी माझी आवडती माणसे होतीच की अवतीभोवती...पण तरीही एक पोकळी निर्माण झाली होती....जी तुझ्या येण्याने अगदी काठोकाठ भरून गेली. तुला प्रश्न पडला असेलच..असे कसे..?. ...कारण अशा कोणत्याच भावनिक गुंतागुंतीत आपण अडकलो नव्हतो.. किंवा ज्याला कमिटमेन्ट म्हणतात असेही काहीच नव्हते. मग माझ्या आयुष्यात तुझ्या येण्याने इतका फरक का पडावा...???... नाही...तुला हे वाटणे आणि असले प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे... कारण फारफार तर आपली तोंडओळख... त्यापलीकडे विशेष काही नाही.. एक बंध जो क्षणिक होता...जो ओसरून ही गेला... पण तू माझ्यासाठी माझे प्रतिबिंब होतास...किंबहुना आहेस..! माझ्यापेक्षा लहान... समंजस... विचारी.... विवेकी आणि त्यामुळे तुला पाहिले की दहा वर्षांपूर्वीची मी झर्रकन माझ्या समोर येऊन उभी राहिले..! हे असं... मागचं 'वय' तुमच्या सोबत चालायला लागलं की आयुष्याची फार गम्मत वाटते. आपले हरवलेले अनेक क्षण आपण पुन्हा जगू लागतो... आणि हे जगणं म्हणजे "स्व"ला आत्मिक शांतिकडे घेऊन जाण्याचा प्रवास आहे... असे मला मनापासून वाटते. एखाद्याच्या पूर्वी राहिलेल्या इच्छा पुन्हा त्या काळात जाऊन पूर्ण करता आल्या तर त्याला जो काही आनंद होईल अगदी...तो..आणि तसाच आनंद मला तुझ्या सोबत मिळतो.  


                      हा माझ्यापुरता मर्यादित असलेला आणि सर्वस्वी माझ्या आत्मिक अनुभूतिकडे घेऊन जाणारा वैयक्तिक प्रवास आहे... मी कितीही प्रयत्न केला तरी त्या आनंदात तुला सामावून घेता येणे अशक्यच.... आपल्यात एक अनामिक बंध असूनही अस अलिप्त रहाता येणे सहज शक्य आहे...हे मला माहीत होणे केवळ तुझ्यामुळे शक्य झाले.


          वैशाखाच्या रणरणत्या उन्हात जसा गुलमोहर बहरून येतो...अगदी तसच माझे झाले आहे बघ...!...हे बहरून येणे जरी हवेहवेसे वाटले...तरी ऋतू बदलला की हा मोहर देखील ओसरून जाणारच...पण माणूस प्राण्याचे एक मात्र बरे.... या बहरणार्‍या आठवणी तो मनाच्या कप्प्यात कायमस्वरूपी जपून ठेवू शकतो...ज्या त्याच्या असतात...अगदी शेवटपर्यंत...!!


            चहा अजून तेवढेच कप पितोस...की कमी केलास???....माझ्या सायंकाळच्या फेसाळलेल्या कॉफीच्या वाफेसोबत तुझ्या आठवणी आपसूकच दाटून येतात... चहा आवडत नसतानाही तू ऑफर केलेला चहाचा प्रत्येक कप तुझ्यासोबत रिचवताना त्या कपाच्या अडून दिसणार तुझा लोभस चेहरा आजही कॉफीच्या प्रत्येक घोटा सोबत आठवतोच...!! काय रे.... माझी आठवण येते का???


           मला भेटलेल्या अगणिक चेहर्‍यांपैकी एक...पण तो मला इतका व्यापून टाकेल असे कधीच वाटले नव्हते. माझ्या समोर तू असू- नसू त्याचा फार फरक पडत नाही... तेव्हाही तो पडतच नव्हता....कारण तुझे अस्तित्व माझ्यासाठी कालातीत आहे...त्याला कोणतेही बंधन नाही.. हे बंधमुक्त नात फारच सुंदर आहे....आणि म्हणूनच ते प्रिय ही आहे. 


जुस्तजू तुझ से यू हो गई हमे,
आईना जब भी देखते है
अक्स तुम्हारा ही दिखे..!


                 खाँसाहेबांचा हा शेर म्हणजे मीच माझ्या अस्तित्वाचा घेतलेला शोध आहे....!.... आपल्याला असा आत्मशोध घेता आला पाहिजे.... जो आपल्याला आत्ममंथन करत स्वत्वाकडे घेऊन जाऊ शकतो.

                    बघ...परत कधी इकडे येणे झाले तर आठवणीने फोन कर. मी येईल भेटायला... पहिल्यावेळी येवून भेटली होते अगदी तशीच...!.. कोणतेही आढेवेढे न घेता.


                                                                                      तुझ्यात हरवलेली मी शोधणारी,
                                                                                                             सखी 




Comments

  1. प्रत्येक ओळ, शब्द मनाच्या आत खोल खोल शिरत जाणारी आहे. हे दुसऱ्याचं पत्र असलं तरी आपल्याला ते आपलं वाटत जातं. व्यक्ती, नावं, स्थळ बदलत जातात पण भावना एकच असते.

    खरंय..काही माणसं 'खास' असतात. ते आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आयुष्य बदलतं, सकारात्मक होतं.

    गुलमोहोर चा बहर ओसरतो पण आठवणींचा सुगंध असाच दरवळत राहतो.👌👌

    माणसं दूर गेली तरी काळजी असतेच ना! त्यामुळे पिणं कमी केलंय का हा प्रश्न आपसूकच येतो. पण आता पिणं बंद कर, जास्त पिऊ नकोस सिगारेट कमी कर असं सांगणारं कुणी नसतं. (ईथे लेखिकेने चहाचं उदाहरण दिलंय)

    दूर गेलेल्या माणसाच्या भेटीसाठी तिच आतुरता कायम असते.. ☺️

    आपल्या आठवणींना, भावनांना मुक्त विहार करायला लावणारं पत्र..

    ReplyDelete
    Replies
    1. सुहास...माझ्या पत्राला इतका सुंदर अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद..!!....ही पत्र तुम्हाला आपली वाटतात हे ऐकून खूप छान वाटले...पत्रातील भावना वाचकाला भावतात...हे लेखकासाठी उर्मी देणारे आहे.

      Delete
  2. लय चांगली गवसतेय

    ReplyDelete
  3. वा!!! खूपच छान... लिहले आहे...👌 दोनदा वाचले मी... खूप आवडले मला ... मस्तच 😃

    ReplyDelete
  4. खूपच छान लिहले आहे...Tai 🙏💞

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.