सखी'चे पत्र (2)... पुन्हा वळून पाहताना..!

 

                     पत्र (2)


प्रिय अमर, 


                   कुणास ठाऊक का? पण पुन्हा तुझ्याशी बोलावे वाटले म्हणून आज लिहायला बसले... तू जाऊन तसे काही दिवसच झाले असतील....तरी वेळ सेकंदात मोजला की कसा झरझर निघून चालला आहे असे  वाटते....! आपल्याला अनेक वेळा असं वाटत की, आपण तेव्हा ती गोष्ट केली असती तर बरे झाले असते... हे वाटणे म्हणजेच आपल्या जिवंतपणाचे लक्षण आहे असे मी समजते... थोडा थोडा कालावकाश निघून गेला की...काही तरी मागे राहिल्याची जाणीव होऊन आपण पुन्हा वळून पाहतोच की...जस गाव सोडताना तुझे झाले होते अगदी तसेच!

                   हे मागे वळून पहाणं आपल्याला बरेच काही देवून जाते...अनेक अर्थ कळत- नकळत लागत जातात...हा खेळ खूप इंट्रेस्टिंग होत जातो जेव्हा, तो लपंडावा सारखा शोध घेत फिरतो.... तुला आठवतोय का रे... तुझ्या ऑफिसच्या कुंडीत लावलेला गुलाब??... त्याला जेव्हा पहिले पांढरेशुभ्र फूल आले होते.... तेव्हा तुझ्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद होता...आपण प्रेमाने वाढवलेल्या नात्यात देखील असेच गुंतत जातो...! मनाच्या गुंतागुंतीच्या पलीकडे जाऊन उठून दिसणारा तुझा निरागसपणा नेहेमीच भावतो मला. तुझ्या निरागसतेच्या मी प्रेमात आहे असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही....!

                   मन एखाद्या गोष्टीत गुंतणे म्हणजे कायमचे अडकणे नव्हे...मन आणि बुद्धी यांची ही चमत्कारीक देवाणघेवाण हळुवार खुलत जाते.....जेव्हा आपण त्यात सहभागी होऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवतो.... किंबहुना तशा प्रयत्नात असतो...! नैसर्गिकरीत्या एखादी गोष्ट घडत जाणे...आणि त्या गोष्टीला तिचा वेळ देणे हे ही तितकेच महत्त्वाचे..!!... कारण ओढून ताणून घडलेल्या घटना या दीर्घकाळ टिकून रहात नाहीत.

                 नवीन ठिकाणी रूळलास का रे???... इकडच्या गोष्टी तुझ्या अंगवळणी पडल्या होत्या....पण भूतकाळाची ओझी घेऊन प्रवास करणाऱ्यातला तू नाहीस... त्यामुळे इकडील बंधपाश तोडून तू लवकरच प्रवाही होशील याची खात्री आहे मला..! तसाही प्रवाहीपणा हा तुझा स्थायीभाव आहे..... तुझ्या आवडत्या नदीसारखा...!!

                  माझ्या घरातील मोगरा खूप बहरला आहे... आणि त्याचा सुंगध घरभर दरवळतोय...! हा सुगंध मनात भरून ठेवावा वाटतो... वार्‍यासोबत त्याचे असे निघून जाणे मनाला चटका लावून जाते. आपण कितीही प्रयत्न केला तरीही काही गोष्टी या आपल्याला हतबल करतातच... अशावेळी चार ओळी सहज आठवल्या बघ...

हमने कोशिश तो बहुत की
इत्र को संभालने की..
थोड़ी-सी हवा क्या लग गई..
खुशबू वही लुटा ती चली गई..!

                  ही गुंतागुंत फारच रोचक आहे...याकडे मी सकारात्मकतेने अधिक पहात आहे. आपण वाचलेली कादंबरी पुन्हा काही वर्षांनी बुकशेल्फ मधून बाहेर काढून आताच्या संदर्भांसह वाचताना त्यातली गुंतागुंत बरीच कमी झालेली दिसते.....अनेक गोष्टी फार सहज उमगतात... आणि तो वाचनानुभव पराकोटीचा उच्चतम आनंद देऊन जातो...!! जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असे मागे वळून पाहताना गोष्टी खरच सहज होत जातात का रे??  की गोंधळ उडतो मनाचा....आणि मेंदू सैरभैर होऊन धावू लागतो.... हरणाचं मृगजळ पाहून होत असेल अगदी तंस..!?
 
                 तुझ्याशी बोलताना विषय कधीच संपत नाहीत बघ.... चल ऑफिसची तयारी बाकी आहे अजून....तसे अपेक्षांचे ओझे मी कधी तुला दिलेच नाही... पण तरीही वेळ मिळाला तर तुझी चार वाक्य पाठव लिहून...! प्रवाही हो...जसा होतास....आणि आहेस!!

                                

                                                                                                          तुझ्या अनुभवांच्या गर्तेत सापडलेली
                                                                                                                                   सखी.



Comments

  1. 😍😍👌👌👌👌🙏

    ReplyDelete
  2. वाह! पहिल्यापेक्षा हे पत्र रोमॅंटीक झालं आहे. मोगर्‍याचा दरवळलेला सुंगध त्याच्या आठवणी जागृत करतोय.. गुंतागुंत रोचक आहे… पण बदलत्या काळानुसार गुंता सुटत जाईल एवढं नक्की.
    तो प्रवाही आहे… थांबला नाही…थांबणार नाही.. मागे वळूनही बघणार नाही

    ReplyDelete
  3. Thanks सुहास... पहिल्या पत्रात तिला सुचतच नव्हत त्याच्याशी काय बोलावे आणि किती...आता ती हळूहळू खुलत जाते आहे.

    ReplyDelete
  4. हमने कोशिश तो बहुत की
    इत्र को संभालने की..
    थोड़ी-सी हवा क्या लग गई..
    खुशबू वही लुटा ती चली गई..! (lines)... 💝
    Absolutely Fantastic... ❤️❤️

    ReplyDelete
  5. *अमरप्रेम*

    ReplyDelete
    Replies
    1. प्रयत्न करत आहे...बघू हे नातं कुठपर्यंत घेऊन जाते...

      Delete
  6. प्रेम तुटल तर निराश होऊ नका.... कारण स्वतः वर प्रेम करायला तुम्ही जिवंत आहात...

    ReplyDelete
    Replies
    1. प्रेमाची सुरुवात मुळातच स्वतःपासून होते... प्रेम हे उभारी देणारेच आहे.. असते.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.