Posts

Showing posts from November, 2025

परतीची वाट ... नात्यांच्या गुंत्यातून जाणारी!

Image
  परतीची वाट  बाहेर पडणं किती अवघड हे गुंतल्याशिवाय समजत नाही, होणारी ही असीम तगमग अनुभवल्याशिवाय उमगत नाही.. नात्यांच्या मंद उजेडात आपण कोणाच्या सावलीत मिसळतो, तर कधी कोणाच्या शांततेत आपणच स्वतःला हरवून बसतो.. कधी ओढ इतकी हलकी, की स्पर्श होऊनही जाणवत नाही, कधी अंतर इतकं दाट, की जवळ असूनही भेटत नाही.. गुंतवताना काही गाठी प्रेमाच्या हे कळत नाही, आणि सुटताना त्याच गाठी वेदनेच्या होत्या हे जाणवत नाही.. कधी कधी नाती सुटण्याची इच्छा नसतानाही सुटतात, कारण ज्यांना धरून ठेवतो, तेच हातातून नकळत निसटतात.. आणि शेवटी जाणवतं, प्रेमाचा अर्थ जवळ ठेवण्यात नाही.. तर ज्यांच्या सोबत असताना आपण स्वतःपासून दूर जात नाही, असं नातं अनामिक असलं तरी खरं, टिकणारं आणि अत्यंत सुंदर असतं..! -तेजश्री शिंदे ✍️ 

अनुभवायचं असतं..(कविता)

Image
  अनुभवायचं असतं फक्त जगायचं म्हणून जगू नये, क्षणांचा अर्थ उलगडून घ्यायचा असतो.. हसण्यातली निरागसता, आणि अश्रूतली शांतता  दोन्ही अनुभवायचं असतं..! फुलं उमलतात म्हणून नव्हे, त्यांच्या सुगंधात हरवायचं असतं.. वार्‍याच्या हलक्या स्पर्शात, थरथरणाऱ्या मनाचं बोलणं निरवपणे ऐकायचं असतं..! जगण्यातली धाव पुरेशी नसते, थोडं थांबून वाटही पाहायची असते.. मनाच्या कोपऱ्यातल्या गप्पा, एखाद्या शांत संध्याकाळी स्पंदनांनी ऐकायच्या असतात..! आठवणी बनवायच्या नसतात, त्या नकळत मनात जपल्या जातात.. माणसं जिंकायची नसतात, ती मनापासून समजून घ्यायची असतात..! कारण,  जीवन हे जगण्यात नव्हे, ते अनुभवण्यात सार्थ ठरते.. आणि प्रत्येक अनुभवातूनच, मनुष्यपणाचे श्वासपर्व उभारते..!             -तेजश्री शिंदे ✍️ 

पुन्हा त्यात गुंतणे बरे नाही..!

Image
  पुन्हा त्यात गुंतणे बरे नाही.. एकदा काढता पाय घेतला, पुन्हा त्यात गुंतणे बरे नाही। मनातल्या वादळांना थांबू दे, त्या लाटेत बुडणे बरे नाही। त्या जखमांवर फुंकर घालावी, पुन्हा त्यात झुरणे बरे नाही। स्मृतींचे गुंते सोडू या जरा, भूतकाळात वसणे बरे नाही। ज्याने स्वप्नांतून शिकून घेतलं, त्याने पुन्हा झोपणे बरे नाही। ज्याने स्वतःला सापडलं एकदा, त्याने पुन्हा हरवणे बरे नाही। शब्द गप्प, नजरेत प्रश्न राहू दे, त्या मौनाला तोडणे बरे नाही। शांततेच्या काठावर सुख सापडतं, त्या सागरात रडणे बरे नाही। एकदा काढता पाय घेतला, पुन्हा त्यात गुंतणे बरे नाही।                                   - तेजश्री शिंदे ✍️