Posts

Showing posts from April, 2025

माणूस ओळखून ठार मारले गेले.

Image
माणूस ओळखून ठार मारले गेले. आता माणूस असणं धोकादायक झालंय... जिवंत असताना मृत्यूसाठी पात्र ठरवायचं काम एका नावाने, एका धर्माने, एका प्रश्नाने होतंय. "तुमचं नाव काय?" हा प्रश्न आता तुमचं आयुष्य ठरवतो. पण उत्तरात 'माणूस' म्हटलं, तर त्या उत्तरालाच गोळी घातली जाते. कधी वाटायचं की "माणूस" ही ओळख पुरेशी आहे... पण हल्ली तीच ओळख जीवघेणी ठरते आहे. डोळ्यांत आता ममत्व नाही, माणुसकीचा ओलावा नाही.. तिथं आहे फक्त एक थंड तपासणी. एखाद्या सीसीटीव्हीसारखी नजर — जी सतत विचारते, "तू कोण? कुठल्या बाजूचा?" आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत प्रत्येक स्पंदनाला संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. ज्यांनी डोंगरात फुलं शोधायला पाय ठेवले, त्यांच्या हातात अखेर तिरडीचे हार आले. ज्यांनी थोडा निवांत श्वास घ्यावा म्हणून हिरव्याकंच हिरवळीत पाऊल ठेवलं, त्यांचं शेवटचं छायाचित्र गेल्या बातम्यांमध्ये "अपरिचित मृतदेह" म्हणून दाखवलं गेलं. त्या फोटोत दिसणाऱ्या पोरीच्या डोळ्यांत न शांतता आहे, न अश्रू — तिथं आहे एक भेसूर थांबलेली वेळ, जी किंकाळीत व्यक्त न होता...

तहान... उभ्या आयुष्याची !

Image
तहान  कधी वाटतं, आयुष्य म्हणजे एक संथ वाऱ्यासारखं आहे — न कळणाऱ्या दिशा, न निश्चित ठिकाण. फक्त चालत राहावं लागतं… कधीकधी स्वतःलाही न समजणाऱ्या पावलांनी. क्षणभर वाटतं, "हेच तर पाहिजे होतं!" आणि पुढच्याच वळणावर तेच मागे फेकून चालतो  आपण… हातात न सुटलेली ओढ आणि मनात न पुसलेला प्रश्न घेऊन. सुख येतं, अपूर्व आनंदासारखं… पण थांबत नाही. दुःख येतं, मोकळ्या आभाळासारखं… आणि हक्काने पसरतं. या सार्‍याच्या मधोमध एक व्यक्ती — शोधत असते ‘काहीतरी’… नाव नसलेलं, शब्दात न मावणारं, पण आत खोलवर असणारं. ती व्यक्ती कधी "मी" असते, कधी "तू", कधी कुठलीही ओळख नसलेली एक झलक... ...आणि त्या शोधात, सापडणं-हरवणं, थांबणं कुठेच नाही — फक्त क्षणभर, एखादा विचार आपल्याला बघतो आणि आपण त्याचं उत्तर होतो… क्षणभरासाठीच.                                             - तेजश्री शिंदे ✍️

माझ्या कवितेच्या "रानफुला"

Image
नाही तुला माळेत जागा, नाही देवघरातली साज सज्जा, तरीही तू बहरतोस माझ्या शब्दांच्या मोकळ्या रानात.. कधी एकटा बसतोस पानगळीखाली, कधी पावसात चिंब भिजतोस, तुझं सौंदर्य इतकं अलवार, आणि तरीही — ओसाडावर खुलतोस  लोक विचारतात कवितेचा अर्थ, मी फक्त तुझ्याकडे पाहते... माझ्या कवितेच्या रानफुला मोकळ्या मनाच्या संवेदना.  नाहीस तू शोभेचा गुलाब, पण आहेस माझी — मनाच्या जमीनीवर स्वतःहून उगवलेली कविता.                                        - तेजश्री शिंदे ✍️