भूमिका (कविता)
भूमिका आजकाल मी कोणतीही भूमिका घेत नाही. कारण प्रत्येक भूमिका एक ओळख मागते, आणि आता माझ्याकडे ओळखी उरलेल्या नाहीत. कधीकाळी मी "मी" होते.. गाभाऱ्यात उभ्या मूर्तीइतकी स्थिर, पण बाहेर चाललेल्या नाट्यगृहात ती मूर्तीही एक पात्रच ठरली… पाहता पाहता लक्षात आलं.. स्वतःचं अस्तित्व ही सुद्धा एक कल्पना होती, जशी वेळ ही केवळ घड्याळात दिसते, आणि "निर्णय" हे केवळ पूर्वसंस्कारांचं रांगणारं सावट. निर्णय माझे नव्हते, ते माझ्या श्वासांतून फक्त वाहिले. जणू एखाद्या पानावरून वारा वाहतो पण पान कधीच वाऱ्याचा स्रोत नसतो… आज मी निवडते निवड न करण्याचं स्वातंत्र्य. साक्ष होणं हीच माझी नवी भूमिका जिथे मी पात्र नाही, तर "दृश्य" आणि "द्रष्टा" यांच्यात पडलेला निवांत विराम आहे. मी कोण आहे? हा प्रश्नही आता थकला आहे. तोही आता प्रश्न नाही उरलेला.. फक्त एक शांतता आहे जिच्यात सर्व प्रश्न विलीन होतात. उरते फक्त एक अस्तित्व.. अदृश्य, अलिप्त, ना ‘मी’, ना ‘माझं’, फक्त असणं... एक निर्विकार साक्ष. ...