वळणाने ठरलेली भेट (कविता)
नात्यांच्या, भेटींच्या आणि ओढीच्या कथा नेहमीच ठरवून घडत नाहीत. काही क्षण असे असतात, जे निवडीपलीकडे जाऊन आयुष्याच्या वळणावर अलगद समोर येतात—ना कारण मागतात, ना उत्तर. ही कविता अशाच एका शांत, संयत आणि अपरिहार्य भेटीबद्दल आहे; जिथे जवळीक आहे पण हक्क नाही, ओढ आहे पण आसक्ती नाही, आणि मौनातूनच अर्थ गहिरे होत जातात. शब्द कमी आहेत, पण त्यामधली शांतता तुम्हाला थोडा वेळ थांबवून विचार करायला लावेल... ******* वळणाने ठरलेली भेट जुळल्या अशा दोन वाटा, आयुष्याच्या वळणाशी.. वळणानेच ठरवलं सगळं, कारणं मात्र दोघांच्याही ओठांवर कधीच उमटली नाहीत. भेट ही निवड नव्हती, ना जाणीवपूर्वक कृती.. ती घडली, जशी संध्याकाळ हळूच सावली वाढवत जाते, कुणालाही न विचारता. एकमेकांत हरवण्याचा मोह झाला, पण स्वतःला गमावण्याइतपत तो कधीच वाढला नाही.. म्हणूनच ही ओढ इतकी शांत राहिली. जवळीक होती, जशी दोन झाडांच्या सावल्या थोडा वेळ एकमेकांत मिसळतात, पण मुळं मात्र आपापल्या मातीशीच घट्ट असतात. काही न सांगता, काही न मागता, जसं लाटांनी किनाऱ्याला अलगद स्पर्शून मागे फिरावं.. ...