सखी'चे पत्र (8).... ओला वाळवंट!
पत्र (8) प्रिय अमर, अरे.. मी काही लिहिले नाही याचा अर्थ असा मुळीच नाही की तू व्यक्त होणे सोडून द्यावे. माझा राग हा काही फार काळ टिकणारा नसतो हे माहीत असूनही इतक्या महिन्यांचे मौन धारण करणे तुला शोभत नाही. मी काही तुला जज करत नाही आहे बर का!... पण तुझे हे असे तुटक वागणे अगदी पहिल्यांदाच जिव्हारी लागले. आपल्या आवडत्या व्यक्ति सोबत असे कोण वागते. मुळात तुझ्या वागण्याचे अनेक धागे-दोरे मला कधी जुळवताच आले नाहीत बघ. माझ्या सारख्या मनमोकळ्या स्वभावाची व्यक्ती बोलून मोकळी होते... तुझ्यासारखे नाही हो! उगाच आपल्या आविर्भावात जगत रहायचे. असो... तू कॅनडाला तीन वर्षांच्या प्रमोशनवर जाणार म्हणून मी फार आनंदी होते. त्या निमित्ताने एक नवा देश तुझ्या जाणिवेतून उमगून घ्यायला मिळणार याचा कोण आनंद झाला म्हणून सांगू...!! पण कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक??? तू गेलास ते पुन्हा वळून न पहाताच. असे अधूनमधून मागे वळून पाहिले पाहिजे...